नवनिर्माणाची ‘राज’ की बात!

नवनिर्माणाची 'राज' की बात!

शरद जाधव, सिनियर प्रोड्युसर, टीव्ही 9 मराठी मराठीचा मुद्दा घेऊन परप्रांतीयांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या मनसेचं सध्या मतपरिवर्तन झालंय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.. हा प्रश्न उपस्थित होण्याला कारण म्हणजे,  मनसे प्रमुख राज ठाकरे यांची उत्तर भारतीय महापंचायतमधली उपस्थिती आणि उत्तर भारतीयांसाठी खास अस्सखलीत हिंदी भाषण.. मराठीचा आग्रह धरणाऱ्या राज ठाकरेंनी ज्याप्रकारे या मंचावर […]

Team Veegam

|

Jul 05, 2019 | 4:12 PM

शरद जाधव, सिनियर प्रोड्युसर, टीव्ही 9 मराठी

मराठीचा मुद्दा घेऊन परप्रांतीयांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या मनसेचं सध्या मतपरिवर्तन झालंय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.. हा प्रश्न उपस्थित होण्याला कारण म्हणजे,  मनसे प्रमुख राज ठाकरे यांची उत्तर भारतीय महापंचायतमधली उपस्थिती आणि उत्तर भारतीयांसाठी खास अस्सखलीत हिंदी भाषण.. मराठीचा आग्रह धरणाऱ्या राज ठाकरेंनी ज्याप्रकारे या मंचावर जाऊन, हिंदीत उत्तर भारतीयांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत.. त्यावरुन हे मनसेचं नवीन ‘राज’कारण आहे, हे वेगळं सांगण्याची नक्कीच गरज नाही.. 19 मार्च 2006, म्हणजे तब्बल 12 वर्षापूर्वी राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली..  या बारा वर्षांची पक्षाची वाटचाल ही नेहमीच मराठी माणसाचे हक्क, अधिकार आणि त्या अनुषंघानं परप्रांतीयांचा तिरस्कार, त्यांना मारहाण या भोवतालीच गुरफटून राहिली..  सुरुवातीच्या काळात मनसेचं मराठी प्रेम मतदारांना भावलंही.. त्यामुळंच 2009 मध्ये पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले.. त्यापाठोपाठ नाशिकसारखी मोठी महापालिकाही मनसेच्या हातात आली.. मुंबई, पुणे महापालिकेत आवाज उठवू शकतील एवढे नगरसेवक निवडून आले..  पण, जस जसे दिवस बदलले तशी राज ठाकरेंचा झंझावात आणि जमणाऱ्या गर्दीचं रुपांतर मतांमध्ये करण्याचा करिश्माही नाहीसा झाला.. सध्या पक्षाचा केवळ एकच आमदार विधानसभेत आणि मुंबईसारख्या मोठ्या महापालिकेत केवळ एकच नगरसेवक, अशी अत्यंत वाईट अवस्था झाली आहे.. त्यामुळं मनसेची पक्ष म्हणून होणारी पिछेहाट ही राज ठाकरेंसाठी मोठं राजकीय संकट आहे.. त्यामुळंच की काय आता, राज ठाकरेंनी मनसेचं इंजिन पुन्हा एकदा ट्रॅकवर आणण्यासाठी आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केल्याचंच या सर्व प्रकारातून दिसतो.. केवळ मराठी मतांवर अवलंबून न राहता, परप्रांतीय मतांना जवळ करत नवी राजकीय समीकरणं जुळवण्यासाठी कधी नव्हे ते राज ठाकरे पहिल्यांदाच उत्तर भारतीयांच्या विरोधात नव्हे तर त्यांच्यासोबत दिसले.. त्यांना शिव्या घालताना नव्हे, तर त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसले.. आणि तेही मराठीत नव्हे, तर उत्तर भारतीयांच्याच आवडत्या अशा हिंदी भाषेत.. खरंतर उत्तर भारतीय महापंचायत समितीच्या व्यासपीठावर पोहोचल्यानंतर सुरुवातीलाच आपण स्पष्टीकरण देण्यासाठी नव्हे तर आपली भूमिका सांगण्यासाठी आल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं.. पण, मुळात राज ठाकरे ज्याला भूमिका मांडणं म्हणाले, ते स्पष्टीकरणच होतं.. हे वेगळं सांगण्याची नक्कीच गरज नाही.. राज ठाकरेंचं उत्तर भारतीयांच्या मंचावर जाणं, हा काही योगायोग नाहीय.. कारण, मुंबई आणि परिसरातील उत्तर भारतीय मतदारांची वाढलेली संख्या सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष त्यांच्याकडे वेधून घेते आहे.. काँग्रेस असो, भाजप असो किंवा मग आता शिवसेना.. प्रत्येक पक्ष महाराष्ट्रातल्या आणि प्रामुख्यानं मुंबई आणि उपनगरांमधल्या उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून  आहे.. त्यामुळं मोठ्या संख्येनं वाढणाऱ्या या मतदारांचा तिटकारा करणं पक्षाला घातक ठरू शकतं हे आता राज ठाकरेंच्याही लक्षात आल्याचं चित्रं आहे.. 2019 ची रणसंग्राम जस-जसा जवळ येतो आहे, तस-तसा राजकीय पक्षांचा नवमतदार जोडणीचा वेग वाढतोय. याचाच भाग म्हणून शिवसेनेनं उत्तर भारतीयांच्या मतांवर नजर ठेवून अयोध्येत जाऊन पुन्हा एकदा राम मंदिराच्या आडून हिंदूत्वाचा नारा बुलंद केला.. हिंदुत्ववाद्यांबरोबरच  सध्या भाजपची हक्काची वोटबँक बनलेल्या मुंबई आणि परिसरातील उत्तर भारतीय मतदारांना गळाला लावण्याची शिवसेनेची ही खेळी आहे, हे राजकारण जाणणाऱ्या प्रत्येकाला माहित आहे.. दुसरीकडे परवापर्यंत मनसेनं कायम उत्तर भारतीयांच्या विरोधात राजकारण केलं.. पण, भाजपच्या झंझावातापुढे केवळ मराठीच्या मुद्दा धरून आता पक्षाला फायदा होणार नाही, हे राज ठाकरेंनाही आता कळून  चुकलेलं असावं.. त्यामुळंच शिवसेनेप्रामाणे अयोध्येत नाही.. पण  किमान मुंबईत तरी उत्तर भारतीयांच्या समोर उभं राहून, पक्षाची भूमिका सांगायची.. उत्तर भारतीयांचं मनपरिवर्तन करायचं मनसेनं ठरवलं आणि काहीसं तसं घडलंही.. राज ठाकरेंनी भलेही डोस पाजण्याच्या शैलीत असो.. पण मुंबईतील उत्तर भारतीयांच्या विरोधात नव्हे, तर त्यांच्या हक्काच्या बाजूनं आवाज उठवण्याचा प्रयत्न केला.. राज ठाकरेंचं बोलणंही अनेकांना पटलंही.. त्यामुळं आता हे ‘राज’कारण आणि मतांची गोळा-बेरीज मनसेला फायदेशीर ठरते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.. (नोट : ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें