BLOG : एका चाणक्याचे भाकीत…

| Updated on: Feb 27, 2021 | 6:11 PM

पडद्यामागे निवडणुकीचं काय काय चाललेलं असतं याचं ज्याला कुतूहल आहे अशाना प्रशांत किशोर हे नाव नवं नाही..(Special Report Prashant Kishor Indian political strategist)

BLOG : एका चाणक्याचे भाकीत...
प्रशांत किशोर
Follow us on

मुंबई : पश्चिम बंगालच्या निकालासंबंधी  व्यक्त केलेल्या अंदाजावर मी अजूनही ठामच आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊन मतदान अजून जवळ आलं तरी मी ठामच आहे. भाजपला पश्चिम बंगालमध्ये 2 अंकी जागासुद्धा मिळणार नाहीत. म्हणजे 294 पैकी 9 पेक्षा जास्त जागा भाजप जिंकू शकणार नाही.” ….हे भाकीत आहे प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचं. निवडणुकांमध्ये ज्याला रस आहे, पडद्यामागे निवडणुकीचं काय काय चाललेलं असतं याचं ज्याला कुतूहल आहे अशांना प्रशांत किशोर हे नाव नवं नाही..(Special Report Prashant Kishor Indian political strategist)

भाजप, काँग्रेस, आप, तृणमूल, वायएसआर काँग्रेस, द्रमुक, जेडीयू अशा विविध पक्षांच्या नेत्यांना निवडणुकांत राजकीय सल्ले देणारे, निवडणुकीचे धोरण, सामान्य नेत्यांना प्रभावी बनवण्याचे काम त्यांनी केलंय. अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर आदित्य ठाकरे यांच्यात झालेले बदल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रशांत किशोर दोन-तीन वेळा मातोश्रीवर आले होते. या भेटीत आदित्य यांना ग्रुम करण्यावर चर्चा झाली. किशोर हे शिवसेनेच्या प्रत्यक्ष कँपेनमध्ये नव्हते. पण आदित्य ठाकरेंना त्यांनी केलेलं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरलं यात वाद नाही.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना मिळालेलं यश हा किशोर यांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू होता. नरेंद्र मोदी करण थापरची मुलाखत अर्ध्यावर सोडून गेलेला व्हिडीओ साऱ्यांनी बघितलाय. आजही तो यू ट्यूबवर आहे. मोदींना तर हा प्रसंगच आठवायला नको होत होते. पण किशोर यांनी मोदींना ही मुलाखत आणि त्यातले अडचणीचे प्रश्न किमान 30 वेळा दाखवले आणि अशा प्रश्नांना कसे सामोरे जायचे ते शिकवले असे म्हणतात. चाय पे चर्चा, थ्री डी रॅली, रन फॉर युनिटी, मंथन आणि सोशल मिडीयाचा प्रभावी वापर ही प्रशांत किशोर यांचेच प्रॉडक्ट्स आहेत.

श्रीकांत पांडे या डॉक्टरांच्या पोटी जन्मलेल्या प्रशांत किशोर पुढे गुजरातेत भाजपच्या संपर्कात आले आणि मोदींच्या सरकारमधलं कुठलंही पद नसताना प्रचंड प्रभावी बनून गेले. 2012 ला मोदींना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यात प्रशांत किशोर यांचा मोठा हात होता.

प्रशांत किशोर हे 2015 ला नीतिशकुमारांच्या एवढे जवळ गेले होते की थेट जेडीयूमध्ये सहभागी झाले. नागरिकत्व कायद्याला नीतिशकुमारांनी दिलेलं समर्थन त्यांना आवडलं नाही आणि बेबनाव झाला. पुढे किशोर यांना पक्षातून काढूनही टाकण्यात आलं.

2017 पूर्वीच्या दोन विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचा धुव्वा उडवला. शेवटी 2016 काँग्रेसनं प्रशांत किशोरांना बोलावलं आणि अमरसिंगांसाठी काम करायला सांगितलं. हे काम इतकं यशस्वी झालं की अमरसिंग विजयी झाले आणि मुख्यमंत्रीसुद्धा बनले. भाजप आणि अकाली दल हरेल असं वाटत नव्हतं, पण किशोर यांचे डावपेच हुकमी ठरले.  2017 च्या उत्तरप्रदेश विधानसभेत मात्र प्रशांत किशोर यांचा पडद्यामागचा करिश्मा चालला नाही. त्यांनी काँग्रेससाठी काम केलं, पण भाजपनेच अभूतपूर्व जागा मिळवत बाजी मारली.

हेही वाचा : Special Report : नंदिग्राम ममता बॅनर्जींसाठी गेमचेंजर ठरणार?

2019 ला आंध्राच्या जगनमोहन रेड्डींनी प्रशांत किशोर यांना सोबत घेतलं. चंद्राबाबूंविरुद्धचा जनतेतला असंतोष या दोघांनीही इतक्या अचूकपणे पकडला की वायएसआर काँग्रेसला 175 पैकी 151 जागा म्हणजे 87% इतकं घवघवीत यश मिळवून दिलं.

2019 लाही देशभरातून मोदींची लाट दिसली. त्यामुळं 2020 साली दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोदी 2015 चा वचपा काढणार असं बोललं जात होतं. केजरीवालांविरुद्ध असंतोष आहे असं हिंदी चॅनेलवाले रोज सांगत होते. पण केजरीवालांनी प्रशांत किशोर यांना सोबत घेऊन 2015 चाच चमत्कार पुन्हा करुन दाखवला. 70 पैकी 62 जागी केजरीवालांची आप विजयी झाली. टक्केवारीत सांगायचं तर हे यश 89 टक्क्यांपर्यंत जातं.

शुक्रवारी 26 फेब्रुवारीला पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पदुच्चेरीच्या निवडणूका जाहीर झाल्यात. या पाच पैकी दोन राज्यांत प्रशांत किशोर निवडणूक धोरणे आणि सल्ले देणार आहेत. तामिळनाडूत द्रमुकच्या स्टॅलिन यांनी तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी प्रशांत किशोर यांच्याशी करार केलेयत. तामिळनाडूत करुणानिधी आणि जयललिता नसलेली ही पहिली निवडणूक आहे. तिथं सत्ताधारी अण्णाद्रमुकविरुद्ध असंतोष आहे. त्यामुळं द्रमुकचे स्टॅलिन यांचे पारडे आधीच जड आहे.

पश्चिम बंगालमध्ये तर प्रशांत किशोर यांचा अंदाज काय आहे तो तुम्ही वर वाचलाच आहे. या अंदाजाचा त्यांनी आज पुनरुच्चार केलाय. यातून किशोर यांचा आत्मविश्वास जाणवतो. पश्चिम बंगालच्या निवडणुकीबद्दल एकदम तटस्थ राहणाऱ्या जाणकारांना 294 पैकी भाजपला किमान 100 जागा तरी मिळतील असं वाटतं. भाजपच्या नेत्यांना भलेही सत्तांतर होईल असं वाटत असेल , पण अनेक तज्ज्ञ ममतान बॅनर्जींच्या तृणमूलच्या जागा घटतील, मते घटतील पण सत्ता कायम राहील असंच म्हणत आहेत. प्रशांत किशोर तर भाजपला एकदमच मुदलात काढत आहेत. दोन अंकीही जागा मिळणार नाहीत हे त्यांचं आत्मविश्वासपूर्ण भाकीत किती खरं होतं आणि किती खोटं ठरतं हे 2 मे रोजी कळेलच ! (Special Report Prashant Kishor Indian political strategist)

हे ही वाचा : 

BLOG : बिनविरोध सरपंच निवडणूक का गरजेची?

BLOG : धनंजय की पंकजा? गोपीनाथरावांनी धर्मसंकट कसं सोडवलं?