Special Report : नंदिग्राम ममता बॅनर्जींसाठी गेमचेंजर ठरणार?

नंदिग्राम आणि तृणमूल यांचं नातं विशेष आहे. त्यामुळे ममतांचा हा निर्णय तृणमूल काँग्रेससाठी गेमचेंजर ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Special Report : नंदिग्राम ममता बॅनर्जींसाठी गेमचेंजर ठरणार?
शुभेंदू अधिकारी वि ममता बॅनर्जी
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 11:29 AM

कोलकाता : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election 2021) राजकीय संघर्ष टिपेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee TMC) यांच्या तृणमूल काँग्रेसची फोडाफोडी भाजपने दोन महिन्यापूर्वीपासूनच सुरु केली आहे. एकीकडे भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah West Bengal) यांनी बंगालमध्ये 200 जागांचा निर्धार केला आहे. तर दुसरीकडे भाजपने ममतांच्या मंत्रिमंडळातील बडा चेहरा असलेले शुभेंदू अधिकारी यांनाच फोडल्याने, ममतांचा संताप अनावर झाला आहे. त्यामुळे ममतांनी शुभेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांचा गड असलेल्या नंदिग्राम विधानसभा (Nandigram Vidhan Sabha) मतदारसंघातून मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे. नंदिग्राम आणि तृणमूल यांचं नातं विशेष आहे. त्यामुळे ममतांचा हा निर्णय तृणमूल काँग्रेससाठी गेमचेंजर ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Mamata Banerjee vs BJP Suvendu Adhikari fight at Nandigram Vidhan Sabha constituency)

ममता बॅनर्जी यांनी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदिग्राममधून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याने, बंगालमधील राजकारण नव्याने ढवळून निघालं आहे. बंगालमधील राजकीय पंडित ममतांच्या या निर्णयाचं वर्णन ‘मास्टरस्ट्रोक’ असा करत आहेत. ममतांनी यापूर्वी अनेक धडाकेबाज निर्णय घेऊन राजकारणात धक्के दिले आहेत. मात्र नंदिग्रामची निवड करण्यामागे निश्चित अशी कारणं आहेत.

नंदिग्रामला विशेष महत्त्व का?

नंदिग्राम हे केवळ एक गाव किंवा एक मतदारसंघ नाही तर बंगालच्या राजकारणाच्या बदलाचं प्रतिक आहे. पश्चिम बंगालच्या इतिहासात नंदिग्रामला विशेष महत्त्व आहे. स्वातंत्र्याच्या आधी नंदिग्रामच्या आंदोलनाने ब्रिटीशांनाही हात टेकायला भाग पाडलं होतं. नंदिग्राममध्ये 2007 मध्ये सर्वात उग्र आंदोलन झालं होतं. जमीन अधिग्रहणाविरोधात आंदोलन करुन, ममता बॅनर्जींनी डाव्यांचं सरकार हद्दपार करुन सत्तेत आल्या होत्या. 2007 मध्ये तत्कालिन बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नेतृत्त्वातील सरकारने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरु केली होती. बुद्धदेव भट्टाचार्य सरकारने सलीम ग्रुपला ‘स्पेशल इकॉनॉमिक झोन’ म्हणून नंदिग्राममध्ये एक केमिकल फॅक्टरी उभी करण्यास मान्यता दिली होती. याविरोधात बंगालमध्ये रान उठलं होतं.

ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला होता. तृणमूलने विरोधी पक्षांची मोट बांधून सरकारविरोधात पवित्रा घेत आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्त्व तत्कालीन विरोधी पक्षनेत्या ममता बॅनर्जी यांनी केलं होतं. तर या आंदोलनाचे नायक होते शुभेंदू अधिकारी.

ममतांच्या विजयाचा मार्ग ठरणार नंदिग्राम?

ममता बॅनर्जींना सत्तेचा सोपान सोपवणारं नंदिग्राम 14 वर्षांनी पुन्हा सत्तेचं केंद्र बनलं आहे. मात्र सध्याची परिस्थिती वेगळी आहे. ममतांचा एकेकाळचे उजवे हात समजले जाणारा शुभेंदू अधिकारी यांनी तृणमूलशी नातं तोडलं आहे. ते आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे तृणमूलचा आणि पर्यायाने शुभेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला समजलं जाणारं नंदिग्राम, यंदा कुणाला विजयाचा टिळा लावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जिथे भाजपने भगदाड पाडलं, तिथूनच ममता मैदानात

ज्या नंदीग्राममध्ये भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला भगदाड पाडलं त्याच ठिकाणी ममता बॅनर्जी विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. भवानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा पारंपारिक मतदारसंघ आहे. मात्र त्यांनी नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे नेते शुवेंदू अधिकारी यांनी 2016 मध्ये तृणमूलच्या तिकिटावर नंदीग्राममधून निवडणूक लढवली होती. मात्र, सुवेंदू अधिकारी यांच्यासह खासदार सुनील मंडल, माजी खासदार दशरथ तिर्की यांच्यासह 10 आमदारांनी गेल्याच महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यातील पाच आमदार तृणमूलचे आहे.

तृणमूलमधील हे आजवरचे सर्वात मोठं बंड असल्याचं मानलं जात होतं. खासदार, माजी खासदार आणि आमदारही पक्षाला सोडून गेल्याने नंदीग्राममध्ये तृणमूलच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत नंदीग्रामवर भाजपचं वर्चस्व निर्माण होऊ नये म्हणून ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याची घोषणा करून भाजपच्या खेळीला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे.

मी स्वत:चं नाव विसरु शकते, पण नंदिग्राम नाही

ममता बॅनर्जींनी नुकतंच नंदिग्राममध्ये रॅली आयोजित केली होती. या रॅलीला संबोधित करताना ममता म्हणाल्या, मी मी स्वत:चं नाव विसरु शकते, पण नंदिग्राम नाही. नंदिग्राम हे जबरदस्तीने जमिनी अधिग्रहित करणाऱ्यांच्या विरोधाचं प्रतिक आहे. ही जागा तृणमूलसाठी पवित्र आहे. मी गेल्या निवडणुकीत आमचा पहिला उमेदवार इथेच घोषित केला होता”

दरम्यान, ममतांनी 14 मार्च 2007 मधील नंदिग्राम आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात जीव गमावलेल्या आंदोलकांच्या नातेवाईकांना पेन्शन देण्याची घोषणा ममतांनी केली आहे. खरं पाहिलं तर भवानीपूर हा ममतांचा पारंपारिक मतदारसंघ. त्यामुळे ममता या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

शुभेंदू अधिकारी भाजपचा हुकमी एक्का

ममतांचा उजवा हात समजले जाणारे शुभेंदू अधिकारी आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे भाजपसाठी हाच हुकुमाचा एक्का आहे. खरी लढाई आता ममता बॅनर्जी विरुद्ध शुभेंदू अधिकारी यांच्यात सुरु झाली आहे. नंदिग्रामचं रणांगण या दोघांच्या वाकयुद्धाने गाजत आहे. तृणमूल सोडणारे देशाचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती बनू शकतील, पण मी जिवंत असेपर्यंत बंगालला भाजपच्या हातून विकू देणार नाही, असा एल्गार ममतांनी केला आहे.

दुसरीकडे शुभेंदू यांनीही ममतांना चोख उत्तर देण्याचा निर्धार केला आहे. ममतांनी आपल्या नंदिग्राममधून निवडणूक लढण्याची घोषणा केली असताना, आता शुभेंदू अधिकारी यांनी ममतांच्या भवानीपूरमधून मैदानात उतरण्याची चाचपणी सुरु केली आहे.

ममतांचा निर्णय गेमचेंजर का ठरु शकतो?

ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राममधून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने, हा निर्णय तृणमूलसाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. ममतांच्या एण्ट्रीने नंदिग्राममध्ये धार्मिक ध्रुवीकरणाची शक्यता बळावली आहे. मेदिनीपूरमध्ये मुस्लिम आणि हिंदू मतांच्या ध्रुवीकरणावर ममता अंकुश ठेवतील का हे पाहावं लागेल.

पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात मुस्लिम धर्मीयांची संख्या जवळपास 14.6 टक्के आहे. मात्र या जिल्ह्यातील नंदिग्राम या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या निर्णायक आहे. 2011 च्या जनगणनेनुसार नंदिग्राम ब्लॉक-1, ब्लॉक-2 आणि नंदिग्रामच्या झोपडपट्टीभागात मुस्लिम समुदायाची लोकसंख्या 34,12.1 आणि 40.3 टक्के अशी होती. यामध्ये 9 वर्षात निश्चितच वाढ झाली आहे.

मागील निवडणुकीत काय झालं होतं? 

मागील तीन निवडणुकांमधील आकड्यांवरुन मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक होती हेच दर्शवतं. 2006 मधील विधानसभा निवडणुकीत इथे पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर मुस्लिम उमदेवार होता. दोघांमधील विजयाचं अंतर केवळ 3.4 टक्के होतं.

मग 2011 च्या निवडणुकीत तृणमूलच्या मुस्लिम उमेदवाराने CPI च्या हिंदू उमेदवाराचा पराभव केला होता. त्यावेळी जय-पराजयाचं अंतर तब्बल 26 टक्के होतं. मग 2016 मध्ये शुभेंदू अधिकारी यांनी 2011 मध्ये तृणमूलच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा 7 पट अधिक मतं मिळवली होती. त्यावेळी शुभेंदू यांची CPI च्या मुस्लिम उमेदवाराविरुद्ध लढत झाली होती. त्यावेळी शुभेंदू यांनी मोठा विजय मिळवला होता.

राजकीय जाणकार काय सांगतात?

राजकीय जाणकारांच्या मते, जर ममतांनी नंदिग्राममधून लढण्याची घोषणा केली नसती, तरी TMC ने यंदा इथून मुस्लिम उमेदवारच मैदानात उतरवला असता. अशा परिस्थितीत भाजपला नंदिग्राममधील हिंदू मतांचा फायदा झाला असता. मात्र ममतांच्या उमेदवारीने भाजपच्या रणनीतीला झटका बसू शकतो.

बंगालमधील राजकीय गणित काय?

पश्चिम बंगालमध्ये 294 सदस्यांची विधानसभा आहे. 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने तब्बल 219 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवलं होतं. या विजयासाठी ममता बॅनर्जींनी सलग दुसऱ्यांदा बंगालमध्ये सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी काँग्रेसला केवळ 23, डाव्यांना 19 आणि भाजपला 16 जागाच मिळाल्या होत्या. आता भाजप आपल्या 16 जागांवरुन किती जागांवर विजय मिळवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बंगालमधील पक्षीय बलाबल (2016)

    1. तृणमूल काँग्रेस -219
    2. काँग्रेस -23
    3. डावे – 19
    4. भाजप – 16
    5. एकूण – 294

(Mamata Banerjee vs BJP Suvendu Adhikari fight at Nandigram Vidhan Sabha constituency)

संबंधित बातम्या   

शनिवार विशेष : ममता बॅनर्जींना सत्तेत आणणाऱ्या नंदिग्रामची कहाणी, पुन्हा नंदिग्राम का गाजतंय?

ममतांच्या आमदारांची फोडाफोडी, मराठी नेत्यांवर विशेष जबाबदारी, भाजपचं ‘मिशन बंगाल’ नेमकं काय?

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.