नशीब असावं तर असं, चित्रपट फ्लॉप झाला पण गाणी ठरली प्रचंड सुपरहिट, आजही त्या गाण्याची प्रचंड क्रेझ
नशीब असावं तर असं, 16 वर्षांपूर्वीचा फ्लॉप चित्रपट, पण त्यामधील सर्व गाणी ठरली सुपरहिट. आजही प्रत्येक गाणं ऐकू येताच लोक धरतात ठेका. एका गाण्याने तर प्रेक्षकांना लावलं प्रचंड वेड.

चित्रपटसृष्टीतील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे अनेकदा एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकत नाही पण त्यातील गाणी मात्र प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहतात.

चित्रपटाची कथा काळाच्या ओघात विसरली जाते, मात्र त्यातील गाणी वर्षानुवर्षे रेडिओ, लग्नसमारंभ, पार्ट्या आणि सोशल मीडियावर तितक्याच उत्साहाने ऐकली जातात. बॉलिवूडमध्ये अशा अनेक चित्रपटांची उदाहरणे आहेत, ज्यांना त्यांच्या कथानकापेक्षा उत्कृष्ट संगीतामुळे आजही ओळखले जाते.

असाच एक चित्रपट म्हणजे 'तीस मार खान'. दिग्दर्शिका फराह खान यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, कतरिना कैफ आणि अक्षय खन्ना यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. मोठे स्टारकास्ट असूनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला.

चित्रपटाच्या अपयशानंतरही त्याचे संगीत प्रचंड लोकप्रिय ठरले. या चित्रपटाच्या म्युझिक अल्बममध्ये एकूण नऊ गाण्यांचा समावेश होता. त्यामध्ये 'तीस मार खान', 'शीला की जवानी', 'वल्लाह रे वल्लाह', 'बडे दिलवाला' आणि 'हॅपी एंडिंग' या गाण्यांचा समावेश होता.

या सर्व गाण्यांनी त्या काळात संगीतविश्वात चांगलीच धूम उडवली. विशेषतः 'शीला की जवानी' हे गाणे सुपरहिट ठरले आणि चित्रपटापेक्षा अधिक लोकप्रिय झाले. या गाण्यात कतरिना कैफने सादर केलेल्या आकर्षक नृत्याने आणि तिच्या ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. आजही हे गाणे आवर्जून ऐकले जाते.