हेलनला टक्कर देणारी टॉपची अभिनेत्री, एकदा घातलेले कपडे परत घालत नव्हती, काळ बदलला अन् आली उपासमारीची वेळ
50 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री, जिने अभिनय आणि डान्सद्वारे इंडस्ट्रीवर केलं राज्य, एकदा घातलेली कपडे परत कधीच घातली नाही. मात्र, काळ बदलला आणि शेवटी खाण्यासाठी देखील उरले नाहीत पैसे. कोण आहे ती अभिनेत्री?

1950 ते 60 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनय आणि स्टाईलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्या काळात ग्लॅमर, नृत्य आणि आकर्षक स्क्रीन प्रेझेन्स यांना मोठं महत्त्व होतं. मात्र, काही कलाकारांची चमक काळाच्या ओघात फिकी पडली आणि ते हळूहळू दूर गेले.

अशीच एक अभिनेत्री म्हणजे कुक्कू मोरे. या केवळ अभिनेत्री नव्हत्या तर त्या त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय डान्सिंग स्टार्सपैकी एक होत्या. त्यांनी 1946 साली अरब का सितारा या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आयटम डान्स आणि सहाय्यक भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

त्या काळात मुख्य अभिनेत्री नसतानाही स्टारडम मिळवणाऱ्या त्या मोजक्या कलाकारांपैकी एक होत्या. त्यांच्या दमदार डान्स स्टाईलमुळे त्या हेलेन यांसारख्या मोठ्या स्टारलाही टक्कर देत होत्या.

करिअरच्या शिखरावर असताना कुक्कू मोरे यांचं आयुष्य अत्यंत ऐश्वर्यसंपन्न होतं. त्या तीन-तीन आलिशान गाड्यांमध्ये फिरत असत, ज्यापैकी एक गाडी त्यांच्या पाळीव कुत्र्यांसाठी असल्याचंही सांगितलं जातं. असंही म्हटलं जातं की त्या आपले कपडे पुन्हा कधी वापरत नसत. त्यांच्या जीवनात ग्लॅमर, प्रसिद्धी आणि ऐशोआराम यांचा मोठा प्रभाव होता.

मात्र, काळ बदलत गेला तसं त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली. नवीन कलाकारांच्या आगमनामुळे त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळणं कमी झालं. हळूहळू त्यांच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम झाला. एक काळ असा आला की, ज्यांनी कधी आलिशान जीवन जगलं होतं, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यांच्या जवळ मूलभूत गरजांसाठीही पैसे उरले नाहीत. त्यांनी आयुष्याची शेवटची काही वर्षे अत्यंत कठीण परिस्थितीत, एकटेपणात घालवली. 30 सप्टेंबर 1981 रोजी कर्करोगाशी झुंज देत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.