लोकप्रिय अभिनेत्री शेतात करतेय काम, थेट खुरपतानाचे फोटो केले शेअर, सर्वजण करत आहेत कौतुक
एकमेव मराठी अभिनेत्री जिने लोकप्रिय मालिकेत काम करून देखील आपल्या मातीशी घट्ट नाते जपले आहे. आजही ही अभिनेत्री हळदीच्या शेतात काम करताना दिसत आहे.

'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे मालिका संपल्यानंतरही चाहत्यांच्या कायम संपर्कात आहे. अभिनयासोबतच ती आपल्या मातीतल्या नात्यामुळे आणि शेतीप्रती असलेल्या जिव्हाळ्यामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

अनेकदा ती घरच्या शेतात काम करतानाचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी अश्विनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हळदीच्या शेतात खुरपणी करतानाचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये ती अत्यंत साध्या वेशात शेतात काम करताना दिसत असून, हळदीच्या पिकाची मशागत करत असल्याचे पाहायला मिळते.

ग्लॅमरच्या दुनियेत वावरणारी अभिनेत्री असली तरी आपल्या मुळांशी जोडलेली राहण्याचा तिचा स्वभाव या फोटोंमधून स्पष्टपणे दिसून येतो. फोटो शेअर करताना अश्विनीने एक भावनिक आणि प्रेरणादायी कॅप्शनही लिहिले आहे. ती म्हणते, "ओला दुष्काळ असो वा सुका दुष्काळ पडो... त्या त्या वेळी शेतकरी शून्यातून जग उभं करतो. तेच संस्कार वडिलांनी केले. शेतकरी खचत नसतो." या शब्दांतून तिने शेतकऱ्यांच्या संघर्षाला सलाम करत वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांची आठवण करून दिली आहे.

अश्विनीच्या या पोस्टला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असून, तिच्या साधेपणाचे आणि शेतीशी असलेल्या नात्याचे भरभरून कौतुक केले आहे.

अभिनय क्षेत्रात यश मिळवूनही आपल्या मातीशी आणि शेतीशी असलेले नाते जपणारी अश्विनी महागंडे चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिची ही पोस्ट केवळ फोटोपुरती मर्यादित नसून, शेतकऱ्यांच्या संघर्षाची जाणीव करून देणारा आणि त्यांच्या जिद्दीला सलाम करणारा संदेशही देत आहे.