Ajay Devgn: ‘क्राइम पेट्रोल’मधून अजय देवगणची कोट्यवधींची कमाई, तरी मानधनाच्या बाबतीत हाच स्टार नंबर 1
Ajay Devgn: 2003 पासून सुरू असलेला 'क्राइम पेट्रोल' हा शो प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनुप सोनी या शोचं सूत्रसंचालन करत होता. आता अजय देवगणच्या एण्ट्रीमुळे या शोला नवा चेहरा आणि वेगळी ओळख मिळण्याची अपेक्षा आहे.

बॉलिवूडचा 'सिंघम' अर्थात अभिनेता अजय देवगण आता छोट्या पडद्यावरही आपल्या दमदार अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अजय देवगण हा लोकप्रिय क्राइम शो ‘क्राइम पेट्रोल’च्या नव्या सिझनचं सूत्रसंचालन करणार आहे. 31 ऑगस्ट 2026 रोजी या नव्या पर्वाचा पहिला भाग प्रसारित झाला.
सध्या अजयच्या मानधनाची जोरदार चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय देवगणने या शोसाठी तब्बल 90 कोटी रुपयांचा करार केला आहे. 15 एपिसोडसाठी ही रक्कम असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच प्रत्येक एपिसोडमागे त्याला सरासरी 6 कोटी रुपये मिळत असल्याची चर्चा आहे.
अजयच्या या मोठ्या फीमुळे तो भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही होस्ट्सच्या यादीत पोहोचला आहे. मात्र 90 कोटी रुपये मिळूनही तो या यादीत अव्वल स्थानी नाही. अजय देवगणपेक्षा कितीतरी पुढे असलेलं नाव म्हणजे सलमान खान. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान ‘बिग बॉस’चं सूत्रसंचालन करत आहे.
‘बिग बॉस’च्या 15 आणि 16व्या सिझनदरम्यान सलमानला आठवड्याला तब्बल 15 कोटी रुपये मिळत होते. चार महिन्यांच्या सिझनसाठी त्याचं मानधन जवळपास 250 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जातं. नंतरचा सिझन छोटा असल्यामुळे एकूण मानधन 130 ते 150 कोटी रुपयांच्या आसपास राहिलं, तरीही अजयच्या 90 कोटींपेक्षा ते अधिक आहे. त्यामुळे सलमान खानचं नाव भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही होस्टच्या यादीत कायम आघाडीवर आहे.
या यादीत महानायक अमिताभ बच्चन यांचंही नाव आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय क्विझ शोचं सूत्रसंचालन करणाऱ्या अमिताभ बच्चन यांना एका सिझनसाठी 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन मिळत असल्याचं कळतंय. त्यामुळे अजय देवगणची 90 कोटींची फी मोठी असली तरी तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.