Amitabh Bachchan : एका पेन 9 लाखांना, घड्याळांची किंमत तर..; अमिताभ बच्चन यांचं लक्झरी कलेक्शन पाहून व्हाल थक्क
अमिताभ बच्चन, वयाच्या ८३ व्या वर्षीही सक्रिय, त्यांच्या आलिशान जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान वस्तूंचे कलेक्शन आहे. यात महागड्या घड्याळांचा आणि लाखोंच्या पेनचा समावेश आहे. त्यांना गाड्या, संगीत आणि गोल्फचाही छंद आहे.

बॉलिवूडचे शहनेशाह अमिताभ बच्चन यांना खर वेगळ्या ओळखीची, किंवा परिचय करून देण्याची गरजच नाही. कित्येक दशकांपासून मोठ्या पडद्यावर अविरत काम करणाऱ्या बिग बी मोठा पडदा, टीव्ही, सगळं सगळं गाजवलं. 80 वर्ष पार केल्यावरही ते सतत काम करत असतात. ते आपल्या दमदार अभिनयामुळे आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. मात्र अमिताभ हे चित्रपटांव्यतिरिक्त त्यांच्या आलिशान जीवनशैलीमुळेही अनेकदा चर्चेत असतात. वयाच्या 83व्या वर्षीही ते मनोरंजनसृष्टीत सक्रिय असून, त्यांच्याकडे महागड्या गाड्या आणि आलिशान मालमत्तांसह अनेक मौल्यवान वस्तूंचे कलेक्शन आहे. बिग बी यांना अनेक गोष्टींचा छंद आहे. मात्र, त्यांच्या काही छंदांमध्ये महागड्या वस्तूंचा विशेष समावेश आहे. घड्याळं आणि पेन हे त्यांच्या कलेक्शनमधील दोन खास छंद मानले जातात.
महागड्या घड्याळांचे खास कलेक्शन - अमिताभ बच्चन यांना महागड्या घड्याळांचा विशेष शौक आहे. अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या हातात वेगवेगळ्या प्रकारची घड्याळं दिसतात. विशेष म्हणजे, काही प्रसंगी त्यांनी एकाच वेळी हातात दोन-दोन घड्याळंही दिसली.
रिपोर्ट्सनुसार, बिग बी यांच्या कलेक्शनमध्ये Rolex आणि Patek Philippe यांसारख्या जगप्रसिद्ध ब्रँड्सच्या घड्याळांचा समावेश आहे. याशिवाय Baume & Mercier Hampton Classic Chronograph हे घड्याळही त्यांच्या कलेक्शनमध्ये आहे. या घड्याळाची किंमत सुमारे 2 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. इतकेच नाही तर Jaipur Watch Company, Richard Mille RM 010 आणि Seiko Vintage Watch यांसारख्या ब्रँड्सची घड्याळेही अमिताभ बच्चन यांच्याकडे आहेत. त्यांच्या घड्याळांच्या संपूर्ण कलेक्शनची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचे विविध रिपोर्ट्समध्ये म्हटले जाते.
पेनचंही भन्नाट कलेक्शन - अमिताभ बच्चन यांचे वडील डॉ. हरिवंश राय बच्चन हे हिंदी साहित्यातील प्रसिद्ध कवी आणि लेखक होते. त्यामुळे लिखाणाची आवड अमिताभ बच्चन यांच्यातही दिसून येते. बिग बी यांना सुंदर आणि महागड्या पेनं बाळगण्याचाचा विशेष छंद आहे. अमिताभ बच्चन अनेकदा आपल्या जवळ महागडी पेनं ठेवतात. बॉलिवूडमधील कलाकारांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी ते त्यांना पत्र लिहितात. त्यामुळे त्यांच्या पेनच्या कलेक्शनलाही विशेष महत्त्व आहे.
रिपोर्ट्सनुसार, बिग बी यांच्या कलेक्शनमध्ये Montblanc Honor de Balzac या प्रसिद्ध ब्रँडचे पेन आहे. या पेनची किंमत सुमारे 67 हजार रुपये असल्याचे सांगितलं जातं. याशिवाय त्यांच्याकडे डायमंड स्टडेड पेन असून, त्याची किंमत तब्बल 9 लाख रुपयांपर्यंत असल्याचा दावा केला जातो. अमिताभ बच्चन यांच्याकडे विविध ब्रँड्सची अनेक डिझायनर पेन आहेत. त्यांच्या कलेक्शनमध्ये तब्बल 30 पेन असल्याचे रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आलंय. या पेनची एकूण किंमतही मोठी असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, अमिताभ बच्चन हे काही काळ Parker या प्रसिद्ध पेन ब्रँडचे ब्रँड अॅम्बेसेडरही होते.
महागड्या गाड्यांपासून गोल्फपर्यंत अनेक छंद - घड्याळं आणि पेनव्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांना महागड्या आणि आलिशान गाड्यांचीही आवड आहे. संगीत ऐकणं, पुस्तकं वाचणं आणि ब्लॉग लिहिणं याची त्यांना आवड आहे. याशिवाय बिग बी यांना गोल्फ खेळण्याचाही छंद आहे. क्रिकेटमध्येही त्यांना विशेष रस असून, ते क्रिकेटचे सामने पाहण्याचा आनंद घेतात.