Ashok Saraf: गुळपोळी खाताना अशोक सराफांना निवेदिता यांनी रोखलं, सर्वांसमोर मामांनी जे उत्तर दिलं… सर्वजण पाहातच राहिले
Ashok Saraf: मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने नुकताच एका कार्यक्रमात अशोक सराफ यांचा एक किस्सा सांगितला आहे. त्यांनी मामांचा मिश्कील स्वभाव कसा आहे हे सांगितले आहे.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांचा ‘आदि अनंत’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आजोबा आणि नातवाच्या नात्यातील धमाल, मस्ती आणि भावनिक क्षण पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, संकर्षण कऱ्हाडेने अशोक मामांचा एक किस्सा सांगितला आहे.
संकर्षणने सांगितलेल्या आठवणींपैकी एक किस्सा आहे परभणीतील. एका कार्यक्रमानिमित्त अशोक सराफ परभणीला आले होते. त्यावेळी संकर्षणच्या आईने सर्वांना घरी जेवायला बोलावण्यास सांगितले. त्यानुसार संकर्षण अशोक सराफ, निवेदिता सराफ आणि इतर सहकाऱ्यांना घरी जेवायला घेऊन आला.
संकर्षणच्या आईने खास गुळपोळी केली होती. अशोक सराफही गुळपोळीचा मनमुराद आस्वाद घेत होते. तेव्हा निवेदिता सराफ यांनी त्यांना थांबवत, "अशोक, तुला साखर आहे, जरा कंट्रोल ठेव," असे सांगितले.
त्यावर अशोक सराफ यांनी क्षणाचाही विलंब न लावता, "अगं, मला साखर आहे, गूळ कुठे आहे?" असे मिश्कील उत्तर दिले.
अशोक सराफ यांच्या या उत्तरातून त्यांच्या विनोदबुद्धीची सहज झलक पाहायला मिळाली. पडद्यावर आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि विनोदाने प्रेक्षकांना हसवणारे अशोक सराफ प्रत्यक्ष आयुष्यातही तितकेच मिश्कील असल्याचे या प्रसंगातून जाणवते.