Ashok Saraf Home: धनंजय माने इथेच राहतात.. अशोक सराफ यांचं घर पाहिलंत का? नेमप्लेटही हटके
Ashok Saraf Home: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं घर तुम्ही कधी पाहिलंय का? त्यांच्याइतकीच या घराची नेमप्लेटही खूप खास आहे. 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाशी नेमप्लेटचं खास कनेक्शन आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची लोकप्रियता आजही कायम आहे. त्यांच्या अभिनयाने अनेक पिढ्यांना खळखळून हसवलं आहे. चित्रपटांमधील त्यांचे संवाद आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, अशोक सराफ यांच्या घराची नेमप्लेटदेखील त्यांच्या गाजलेल्या चित्रपटातील एका लोकप्रिय संवादाशी जोडलेली आहे?
अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांच्या घराचं वैशिष्ट्य म्हणजे पांढऱ्या रंगाचा सुंदर वापर. घरातील भिंती, पडदे आणि फर्निचरमध्ये दिसणारी ही रंगसंगती घराला प्रसन्न आणि प्रशस्त लूक देतं.
अशोक सराफ यांचं घर त्यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासाची आठवण करून देतं. घरात विविध ठिकाणी मांडलेले पुरस्कार त्यांच्या यशस्वी कारकिर्दीची साक्ष देतात. पुस्तकं, शोकेस आणि आकर्षक मांडणी यामुळे घराला वैयक्तिक स्पर्श मिळतो.
घरातील लाकडी फर्निचर हे आणखी एक आकर्षण आहे. लाकडाचा नैसर्गिक रंग आणि क्लासिक डिझाइन यामुळे घराच्या सजावटीला उबदारपणा मिळतो.
अशोक सराफ यांच्या घरातील सर्वांत हटके गोष्ट म्हणजे त्यांची नेमप्लेट. ‘अशी ही बनवाबनवी’ या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी साकारलेली धनंजय माने ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याच चित्रपटातील लोकप्रिय संवादाचा संदर्भ त्यांच्या घराच्या नेमप्लेटवर पाहायला मिळतो.
त्यावर ‘धनंजय माने इथेच राहतात.. श्री. अशोक सराफ (द वरजिनल हास्यसम्राट)’ असा मजकूर आहे. अभिनेता सुनील बर्वे यांनीही या नेमप्लेटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे या पाटीची विशेष चर्चा झाली.
अशोक सराफ यांच्या घरातून एक गोष्ट नक्की शिकता येते, ती म्हणजे घर सुंदर दिसण्यासाठी भपकेबाज सजावटच आवश्यक नसते. योग्य रंगसंगती, आठवणी जपणाऱ्या वस्तू, साधं फर्निचर आणि स्वतःची खास ओळख सांगणारी नेमप्लेट यांमुळेही घर आकर्षक बनू शकतं.