13 चित्रपटांतून हकालपट्टी, निर्मात्यांनी अपशकुनी म्हणून हिणवले; आज तिच बोल्ड अभिनेत्री आहे बॉलिवूडची सुपरस्टार
47 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, जिला 13 चित्रपटांसाठी मिळालेला नकार, पण एका चित्रपटाने बदललं नशीब. थेट बनली बॉलिवूडची प्रसिद्ध टॉप अभिनेत्री.

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी विद्या बालन हिने यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. आज तिच्या दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असले तरी करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला अनेक अपयश आणि नकारांचा सामना करावा लागला होता.

विद्या बालनने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात लोकप्रिय टीव्ही मालिका 'हम पांच' मधून केली. या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले झाले. मात्र, सुरुवातीच्या काही चित्रपट प्रकल्पांना यश न मिळाल्याने आणि काही चित्रपट बंद पडल्याने निर्मात्यांनी तिच्यावर ‘मनहूस’ असल्याचा शिक्का मारला. परिणामी तिला तब्बल 13 चित्रपटांतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

एका मुलाखतीत विद्या बालनने सांगितले होते की, सतत मिळणारे नकार आणि लोकांच्या कटू वागणुकीमुळे तिचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला होता. अनेकदा ती रडत-रडत झोपायची. तिने दक्षिणेतील चक्रम हा चित्रपट आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचेही सांगितले होते. मात्र, हा प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने तिच्या करिअरला मोठा धक्का बसला.

तथापि, या सर्व अडचणींवर मात करत विद्याने स्वतःला पुन्हा उभे केले. तिच्या कारकिर्दीला 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या No One Killed Jessica या चित्रपटामुळे नवे वळण मिळाले. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर आलेल्या The Dirty Picture या चित्रपटाने तिच्या आयुष्याला कलाटणी दिली.

या यशानंतर विद्या बालन बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक बनली. संघर्ष, नकार आणि टीकेचा सामना करूनही जिद्दीच्या जोरावर यश मिळवता येते, याचे ती एक प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.