दिग्दर्शकाने स्वत:च्या मुलालाच संधी दिली अन् सीरिजने कमालच केली; तब्बल 3.1 कोटी व्ह्यूज
Web Series: दोन महिन्यांपासून या वेब सीरिजने ओटीटीवर आपला जम बसवला असून त्याला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. यात प्रसिद्ध दिग्दर्शकाने त्यांच्या मुलालाच संधी दिली आहे. त्याच्या अभिनयाचंही चांगलंच कौतुक होत आहे.

ओटीटीच्या जगात सध्या एका वेब सीरिजची जोरदार चर्चा आहे. या सीरिजने स्ट्रीमिंग विश्वात मोठी कामगिरी केली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही या सीरिजची लोकप्रियता कायम आहे. आतापर्यंत या सीरिजला 3.1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले असून तब्बल 7.3 कोटी वॉच अवर्स नोंदवण्यात आले आहेत.
या सीरिजचं नाव ‘प्रीतम अँड पेड्रो’ असून ही सायबर क्राइम, कॉमेडी आणि थ्रिलरचा मेळ साधणारी वेब सीरिज आहे. राजकुमार हिरानी यांनी या सीरिजची निर्मिती केली असून अविनाश अरुण यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हलकाफुलका विनोद, भावनिक क्षण आणि डिजिटल गुन्ह्यांची पार्श्वभूमी यामुळे सीरिजची कथा वेगळी ठरते.
या कथेत गोवा ही महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. अरशद वारसीने साकारलेला पेड्रो हा जुन्या विचारांचा पोलीस अधिकारी आहे. त्याची बदली आयटी सेलमध्ये होते. दुसरीकडे वीर हिरानी यांचा प्रीतम हा तंत्रज्ञानात हुशार आणि कोडिंगमध्ये पारंगत तरुण आहे. दोघांची जोडी डिजिटल गुन्हे आणि अपहरणाच्या रहस्यमय प्रकरणांचा तपास करताना दिसते.
सीरिजमध्ये अरशद वारसी आणि वीर हिरानी यांच्यासोबत विक्रांत मेस्सी, बोमन इराणी आणि मोना सिंह यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे राजकुमार हिरानी आणि त्यांचा मुलगा वीर हिरानी यांची ही व्यावसायिक जोडीही प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. प्रीतमच्या भूमिकेतील वीरच्या अभिनयाचं कौतुक झालं आहे.
या सीरिजचं वैशिष्ट्य म्हणजे सायबर क्राइमसारखा गंभीर विषय मांडताना त्यात विनोद, भावना आणि मनोरंजनाचा समतोल साधण्यात आला आहे. ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल सुरक्षेसारखे विषयही कथेत गुंफण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ थ्रिलर पाहणाऱ्या प्रेक्षकांसोबतच कौटुंबिक प्रेक्षकांनाही ही कथा जोडून घेते.