Madhuri Dixit: लग्नाची 27 वर्षे.. डॉ. श्रीराम नेने यांची रोमँटिक पोस्ट; माधुरी दीक्षितला म्हणाले ‘आजही तू माझी..’
माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या लग्नाच्या 27 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. ग्लॅमरच्या दुनियेत असूनही या जोडप्याने नात्यातील प्रेम, मैत्री आणि एकमेकांना दिलेली साथ जपली आहे.

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने हे मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या माधुरीच्या वैयक्तिक आयुष्याचीही नेहमीच चर्चा होते. आता माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या लग्नाला 27 वर्ष पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी डॉ. नेने यांनी सोशल मीडियावर लग्नातील काही खास आणि जुने फोटो शेअर करत पत्नीसाठी प्रेमळ संदेश लिहिला आहे.
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त डॉ. श्रीराम नेने यांनी माधुरीसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. 17 ऑक्टोबर 1999 रोजी दोघांनी एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला होता. या खास दिवसाची आठवण करून देताना त्यांनी सांगितलं की, कुटुंबीय, परंपरा, आशीर्वाद आणि हिंदू विवाहातील पवित्र वचनांसह त्यांनी आपल्या प्रेमाचा आनंद साजरा केला.
27 वर्षांच्या या प्रवासात दोघांनी अनेक आनंदाचे क्षण अनुभवले, आव्हानांचा सामना केला आणि असंख्य आठवणी जपल्या. दोन मुलांसह सुंदर कुटुंब उभं राहिलं. या सगळ्या प्रवासानंतरही माधुरी ही आपली आवडती व्यक्ती आणि सर्वात चांगली मैत्रीण असल्याचं डॉ. नेने यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केलं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिचीच निवड करेन, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
माधुरी दीक्षितने 1999 मध्ये करिअरच्या शिखरावर असताना डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. त्यावेळी माधुरी हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. मात्र, तिचा जीवनसाथी चित्रपटसृष्टीबाहेरील होता. डॉ. नेने हे हृदयरोगतज्ज्ञ असून अमेरिकेत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते.
दोघांची ओळख माधुरीच्या भावामार्फत झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. या जोडप्याने कॅलिफोर्नियातील बेव्हर्ली हिल्स इथं खासगी समारंभात विवाह केला. त्यांच्या लग्नातील काही दुर्मिळ फोटो आता सोशल मीडियावर समोर आल्याने चाहत्यांना त्या खास क्षणांची झलक पाहायला मिळाली आहे.
लग्नानंतर माधुरी अमेरिकेत पतीसोबत राहायला गेली. या काळात तिने चित्रपटांपासून काही काळ अंतर ठेवलं आणि कुटुंबाला प्राधान्य दिलं. या जोडप्याला अरिन आणि रायन अशी दोन मुलं आहेत. मुलांच्या संगोपनासोबतच माधुरीने आपल्या कुटुंबासाठी वेळ दिला. त्यानंतर 2007 मध्ये ‘आजा नचले’ या चित्रपटातून तिने अभिनयक्षेत्रात पुनरागमन केलं. 2011 मध्ये माधुरी आणि डॉ. नेने आपल्या मुलांसह भारतात परतले.