Ukadiche Modak tips : उकडीच्या मोदकांसाठी एकदम सोपी रेसिपी, झटपट होतील तयार
Ukadiche Modaktips : आता लवकरच सर्वांच्या लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे, त्यासाठी सगळ्यांची तयारी सुरु झाली आहे. मुर्ती ठरली, मखर देखील ठरलं, पण मोदकांचं टेन्शन अनेकांना असतं. तर आता मोदकांचं बिलकूल टेन्शन घेऊ नका. सोप्या रेसिपिच्या आधारे झटपट बनवा उकडीचे मोदक...

सर्वात आधी साहित्य जाणून घ्या. 1 कप किसलेला ताजा नारळ, ¾ कप गूळ, ½ टीस्पून वेलची पूड, 1 टीस्पून तूप, थोडी जायफळ पूड... हे साहित्या एका बाजूला ठेवा... त्यानंतर उकडीसाठी 1 कप तांदळाचे पीठ, 1 कप पाणी, 1 टीस्पून तूप आणि चिमूटभर मीठ तुमच्या चवीनुसार घ्या...

त्यानंतर सारण तयार करुन घ्या. सारण तयार करण्यासाठी कढईत तूप गरम करून नारळ आणि गूळ घाला. मंद आचेवर गूळ वितळेपर्यंत ढवळा. मिश्रण थोडे घट्ट झाले की वेलची आणि जायफळ पूड घाला. गॅस बंद करून सारण थंड होऊ द्या.

त्यानंतर उकड तयार करा. पातेल्यात 1 कप पाणी, तूप आणि मीठ घालून उकळी आणा. उकळी आली की गॅस मंद करा आणि तांदळाचे पीठ एकदम घाला. लगेच ढवळून झाकण ठेवून 2–3 मिनिटे वाफ येऊ द्या. मिश्रण थोडे गरम असतानाच हाताला पाणी/तूप लावून मऊसर मळून घ्या.

उकडीचा छोटा गोळा घेऊन हाताने पातळ वाटीसरखा आकार द्या. मध्यभागी 1–1½ चमचा सारण भरा. कडा पाकळ्यांसारख्या घड्या करून वरून बंद करा. मोदकांना वाफवणीच्या ताटलीत ठेवा. साधारण 10–12 मिनिटे वाफ द्या.

मोदक थोडे चमकदार आणि पारदर्शक दिसू लागले की तयार झाले असं समजा. वरून थोडं तूप घालून गरमागरम सर्व्ह करा. मोदक तयार करताना सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे, उकड मऊ ठेवण्यासाठी तांदळाचे पीठ घातल्यानंतर पाणी पूर्ण आटू देऊ नका आणि उकड गरम असतानाच नीट मळा.