
जळगावच्या सराफ बाजारात, सुवर्णपेठेत सोन्या आणि चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. गेल्या आठवडाभरापासून चांदीच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. आता सोन्याने पण चांदीला टशन दिली आहे.

गेल्या 24 तासात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे सोन्याचे दरात तब्बल 2 हजार 400 रुपयांची वाढ झाली आहे. ही गेल्या काही दिवसातील सोन्यातील मोठी वाढ आहे.

सोन्याच्या दराने पुन्हा एक लाखांचा आकडा पार केला असून सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 1 हजार 800 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमती आता एक लाखांच्यावर पोहचल्या आहेत.

तर चांदीच्या दरात आज 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 9 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे या दोन्ही धातुत जणू दरवाढीची स्पर्धा लागली आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मंगळवारी सोन्याची किंमत जवळपास दोन आठवड्यांच्या निच्चांकावर आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदार चिंतेत सापडले. त्याचा परिणाम लागलीच सोन्याच्या मागणीवर दिसून आला.

इस्त्राईलने इराणवर हल्ला केल्याने परिणामी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले आहे. जर हे युद्ध अजून भडकले तर येत्या काही दिवसात दोन्ही धातुंची खरेदी सामान्य ग्राहकांच्या अवाक्या बाहेर असेल.