
संपुर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट असल्याने दुपारी आरोग्याची काळजी घेत बाहेर पडा असं आवाहन केलं जात आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशाच्यावरती असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नांदेडमध्ये तापमान 42 अंशाच्या आसपास पोहोचल्याने केळीच्या फळबागा करपून जात आहेत. तीव्र उष्णतेच्या झळामुळे केळीची पाने जाग्यावरच जळून जात आहेत. आता रमजान महिना जवळ आल्याने केळीला मागणी वाढणार आहे.

मात्र उष्णतेच्या या लाटेचा उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे वाढणारे तापमान केळी उत्पादकांसाठी तापदायक ठरत आहे. त्यातच सध्या नांदेडमध्ये रोजच तापमान नवनवे उच्चांक गाठत असल्याने फळबागा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत

सध्या शेतात असलेल्या अनेक पिकांवरती उष्णतेचा परिणाम होणार आहे. प्रमाणाच्या बाहेर उष्णता असल्याने पीकांना वारंवार पाणी देणं शेतकऱ्यांना शक्य नसतं. त्यामुळे काढणीला आलेली अनेक पीके करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.