एक चूक अन् लता मंगेशकरांच्या गाण्यावर रेडिओने आणली पूर्ण बंदी, 66 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलेलं?
लता मंगेशकर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अजरामर गाणी गायली आहेत. त्यांच्या प्रत्येक गाण्यामागे काही ना काही रंजक आठवणी जोडलेल्या आहेत. असाच एक किस्सा 1960 मधील 'दिल अपना और प्रीत पराई' चित्रपटातील गाण्याशी संबंधित आहे. विशेष म्हणजे, एका चुकीमुळे लोकप्रिय गाण्यावरही बंदी आल्याची घटना घडली होती.

या चित्रपटातील 'शीशा-ए-दिल इतना ना उछालो' हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले होते. या गाण्याचे चित्रीकरण समुद्रकिनारी करण्यात आले होते. त्यावेळी काही महिला डान्सर्सनी स्विमसूट परिधान केल्याने वाद निर्माण झाला होता.
त्या काळात सेन्सॉर बोर्ड आणि ऑल इंडिया रेडिओच्या अधिकाऱ्यांना हे गाणे आक्षेपार्ह वाटले. त्यामुळे रेडिओवर हे गाणे वाजवण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याकाळी ग्रामोफोनवर 78 RPM रेकॉर्ड वापरले जात होते. या रेकॉर्डच्या एका बाजूला 'शीशा-ए-दिल इतना ना उछालो', तर दुसऱ्या बाजूला 'अजीब दास्तां है ये' हे गाणे होते.
बंदी असलेल्या गाण्याच्या बाजूला 'Not Approved' असा शिक्का लावण्याचे निर्देश होते. मात्र, क्लार्कने चुकीने दुसऱ्याच बाजूला म्हणजे 'अजीब दास्तां है ये' या गाण्यावर हा शिक्का लावला.
या चुकीमुळे 'अजीब दास्तां है ये' हे सुंदर गाणेही अनेक वर्षे रेडिओवरून ऐकवले गेले नाही. या गाण्याला शंकर-जयकिशन यांनी संगीत दिले होते, तर हसरत जयपुरी यांनी त्याचे बोल लिहिले होते.