
देशभरात धुळवडीचा उत्साह पहायला मिळतोय. सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटीसुद्धा अत्यंत उत्साहाने रंगपंचमी साजरी करत आहेत. अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोनवार यांनी मुंबईतल्या दादरमध्ये रंगपंचमी साजरी केली आहे.

दादरमधील शिवाजी पार्कात मिलिंद आणि अंकिता यांनी चाहत्यांसोबत रंगपंचमी साजरी केली आहे. त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

'तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. खेळलात की नाही?' असं कॅप्शन देत अंकिता आणि मिलिंदने हे फोटो पोस्ट केले आहेत. फिटनेस फ्रिक असलेल्या मिलिंदसोबत सेल्फी काढण्यासाठी पार्कात चाहत्यांनी गर्दी केल्याचं पहायला मिळालं.

मिलिंदसोबत सेल्फी काढायचं असेल तर चाहत्यांना एक अट पूर्ण करावी लागते. सेल्फीसाठी त्यांना पुशअप्स काढावे लागतात. शिवाजी पार्कात मुलींनीही मिलिंदसोबतच्या सेल्फीसाठी पुशअप्स काढले आहेत.

मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सर्वांनीच याठिकाणी पुशअप्स केल्याचं पहायला मिळत आहे. मिलिंद त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. म्हणूनच सेल्फीसाठी तो चाहत्यांना आधी पुशअप्स करायला भाग पाडतो.

याशिवाय मिलिंद आणि अंकिताने शिवाजी पार्कात डान्ससुद्धा केला. या दोघांनी चाहत्यांसोबत मिळून धमाल रंगपंचमी साजरी केली. मिलिंद आणि अंकिता यांच्या वयात 26 वर्षांचं अंतर आहे.