निक जोनसपूर्वी प्रियंका या व्यक्तीच्या होती प्रेमात, घरच्यांपासून वाचवण्यासाठी प्रियकराला कपाटात लपवलेलं
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आज तिचा 44 वाढदिवस साजरा करत आहे. अशातच तिच्या आत्मचरित्रामधील एक किस्सा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा आज पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरीसोबत अमेरिकेत आनंदी आयुष्य जगत आहे.

मात्र, निक जोनसपूर्वी तिच्या आयुष्यातील पहिल्या प्रेमाची एक रंजक आठवण पुन्हा चर्चेत आली आहे. प्रियंकाने तिच्या 'Unfinished' या आत्मचरित्रात हा प्रसंग सांगितला आहे. दहावीत शिकत असताना ती अमेरिकेतील इंडियानापोलिस येथे तिच्या मावशी किरण यांच्याकडे राहत होती.

त्या काळात ती 'बॉब' (बदललेले नाव) नावाच्या मुलाला डेट करत होती. तो अनेकदा तिला भेटण्यासाठी घरी येत असे. एका दिवशी दोघे घरात टीव्ही पाहत बसले असताना प्रियंकाच्या मावशी अनपेक्षितपणे घरी परतल्या. घाबरलेल्या प्रियंकाने बॉबला आपल्या खोलीतील कपाटात लपवले आणि मावशींना काहीतरी कारण सांगून बाहेर पाठवण्याचा विचार केला.

मात्र, मावशींना संशय आल्याने त्यांनी थेट कपाट उघडण्यास सांगितले. नाईलाजाने प्रियंकाने कपाट उघडताच त्यातून बॉब बाहेर आला. हा प्रकार पाहून मावशी संतापल्या आणि त्यांनी तत्काळ प्रियंकाच्या आईला फोन करून घडलेला प्रकार सांगितला.

या घटनेचा उल्लेख प्रियंकाने तिच्या आत्मचरित्रात केला असून, तिच्या किशोरवयातील हा प्रसंग आजही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतो. आज प्रियंका चोप्रा ही इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.