
पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. त्याने 21 लाखांमध्ये ‘किटली’ नावाचा बैल खरेदी केला आहे.

महागड्या आलिशान कारच्या किंमतीत हा बैल खरेदी केल्याने पंचक्रोशीत एकच चर्चा रंगली आहे. हा बैल पाहण्यासाठी गावात एकच गर्दी झाली आहे.

खेड तालुक्यातील पाचारणेवाडी येथील शेतकरी राजेंद्र पाचारणे यांनी तब्बल 21 लाखांना एका बैलाची खरेदी केली आहे. त्याचे नाव ‘किटली’ असे आहे.

एखाद्या आलिशान कारसाठी जितकी किंमती येते, तितका पैसा किटली खरेदीसाठी खर्च करण्यात आला आहे. राजेंद्र पाचारणे यांनी या बैलाची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. त्यांनी या बैलाचे स्वागत केले.

सध्या ग्रामीण भागातील अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या या बैलगाडा शर्यतीमुळे सर्वत्र पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर बैलाच्या किंमतीत कमालीची वाढ झाली आहे.

बैलगाडा शर्यत सुरु झाल्यामुळं जिल्ह्यातील बैल बाजारही गजबजू लागले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी भरल्या जाणाऱ्या बैल खरेदी विक्री बाजारात पुन्हा एकदा लाखो रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून बैलांची विक्री करण्यासाठी शेतकरी येत आहेत. अश्याच प्रकारे खेड तालुक्यातील पाचारने वाडी येथील शेतकऱ्याने शर्यती मध्ये धावणाऱ्या बैलाची 21 लाखांना खरेदी केली आहे.

शर्यतीच्या बैलासाठी खुराक पण तसाच तगडा असतो. या खुराकमध्ये ड्राय फ्रुट्स आणि वनौषधी वनस्पतींचा समावेश असतो. या बैलाची योग्य निगा राखली जाते.