Ramayana: सिनेमा थिएटरमध्ये आलाच नाही, तरी कमाईचा रेकॉर्ड; रणबीरच्या ‘रामायण’चा धमाका!
रणबीर कपूरच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाने रिलीजपूर्वीच परदेशात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये ॲडव्हान्स बुकिंगला मिळणारा प्रतिसाद पाहता चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. नेमकी किती कमाई झाली? जाणून घ्या सविस्तर!

दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्माते नमित मल्होत्रा यांचा ‘रामायण’ हा बहुचर्चित चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सुमारे 4 हजार कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार होत असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.
‘रामायण’ चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिला भाग यंदाच्या दिवाळीत, तर दुसरा भाग पुढील वर्षीच्या दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.
चित्रपटाच्या भारतातील ॲडव्हान्स बुकिंगपूर्वीच अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये तिकीट विक्रीला सुरुवात झाली होती. या चार देशांमधील सुरुवातीच्या आकडेवारीमुळे चित्रपटाच्या परदेशातील कमाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फिल्म्स डिस्कोर्सच्या आकडेवारीत ‘रामायण’ने परदेशात 1.12 दशलक्ष अमेरिकी डॉलरची कमाई केल्याचा दावा करण्यात आला आहे. रिलीजच्या 15 दिवस आधीची ही कमाई अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया येथील उपलब्ध शोच्या तिकीट विक्रीशी संबंधित आहे.
भारतात दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून, सुरुवातीला निवडक शोसाठीच तिकीट विक्री सुरू असल्याचे समजते आहे. उपलब्ध माहितीनुसार, तिकिटांच्या किमती साधारण 400 ते 500 रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे.
‘रामायण’मध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, रवी दुबे, रकुल प्रीत सिंग, लारा दत्ता आणि अरुण गोविल यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. तसेच, अनुपम खेर यांनी जटायूच्या पात्राला आवाज दिल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.