Sachin Pilgaonka: तिच्या कामाच्या प्रेमात आधी पडलो; सचिन पिळगावकरांनी सांगितला तो किस्सा
Sachin Pilgaonka: मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय जोडीपैकी एक जोडी म्हणजे सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर. आता एका मुलाखतीमध्ये सचिन पिळगावकर यांनी सुप्रिया यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अष्टपैलू अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर हे कायमच चर्चेत असलतात. त्यांनी मराठीसह हिंदी सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांच्या मनात घर केले आहे. त्यांचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. त्यांनी अभिनयासोबत अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. सचिन आणि सुप्रिया पिळगावकर ही जोडी मराठी सिनेमात प्रचंड लोकप्रिय ठरली असून त्यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे.
अलीकडेच एका मुलाखतीत सचिन पिळगावकरांनी पत्नी सुप्रिया यांचे कौतुक करताना एक भावस्पर्शी किस्सा सांगितला. ते म्हणाले, “सुप्रियाबरोबर काम करताना मी आधी तिच्या कामाच्या प्रेमात पडलो होतो. चित्रपट संपल्यानंतरच मी तिला लग्नासाठी मागणी घातली.”
लग्नानंतर परमेश्वराने त्यांना एक मुलगी दिली. २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता श्रियाच्या जन्माची बातमी मिळाली आणि सचिन खूप आनंदित झाले. त्याच दिवशी संध्याकाळी सातच्या बातम्यांमध्ये महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार जाहीर झाले. ‘बनवाबनवी’ चित्रपटासाठी सचिन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा पुरस्कार मिळाला.
तर दुसरीकडे सुप्रियाला ‘माझा पती करोडपती’साठी बेस्ट अॅक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला. “हे जर कुणी पुस्तकात लिहिले किंवा सिनेमात दाखवले तर किती खोटे वाटेल,” असे सचिन म्हणाले.
“पण आमच्या घरात एक बाहुली दोन बाहुल्या घेऊन आली होती. दोघीही प्रचंड टॅलेंटेड आहेत. सुप्रिया अभिनेत्री म्हणून माझ्यापेक्षा उजवी आहे, हे मी शंभर टक्के मानतो. श्रिया ही दोघांपेक्षा वेगळी आहे. तिने स्वतःचे स्थान स्वतः निर्माण केले आहे. आम्हाला तिच्यासाठी कधीही स्ट्रगल करावा लागला नाही, शिफारसही करावी लागली नाही. परमेश्वराची कृपा आहे की हे दोघे केवळ बायको आणि मुलगी म्हणून नव्हे, तर दोन दर्जेदार कलाकार म्हणून माझ्या आयुष्यात आहेत.”