माझ्याकडे पैसेच उरलेले नाहीत, 10-12 वर्षे जगले तर… प्रसिद्ध अभिनेत्रीने हात पसरले, एकहीजण मदतीला नाही
एका प्रसिद्ध अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तिने आर्थिक संकटाविषयी देखील सांगितले आहे. तसेच कोणीही तिच्या मदतीला येत नसल्याचे देखील तिने सांगितले आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री अनिता कन्वल यांनी अलीकडेच एका मुलाखतीत काम मिळवण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षाबद्दल आणि आर्थिक अडचणींबद्दल मनमोकळे केले आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच एकही दिग्दर्शक किंवा निर्माता काम देत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अनिता यांनी सांगितले की त्यांची बचत एका वर्षात संपण्याची शक्यता आहे आणि मानसिक आरोग्यासाठी त्यांना पुन्हा काम मिळणे अत्यंत गरजेचे आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक लोकांशी संपर्क साधूनही अद्याप कोणतेही काम न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
अनेकांना त्यांच्या पूर्वीच्या कामाबद्दल माहिती नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी दर्शवली. आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या टप्प्यांची आठवण काढताना त्यांनी सांगितले की, त्यांनी शाहरुख खान आणि निर्माता प्रकाश झा यांच्यासोबतही काम केले आहे.
सध्याच्या कठीण परिस्थितीबद्दल बोलताना अनिता म्हणाल्या, “मला आता पैशांची खूप गरज आहे. जर मी अजून १०-१२ वर्षे जगले, तर मी काय करेन? माझे घर हीच माझी एकमेव मालमत्ता आहे. माझी बचत एका वर्षात संपेल, त्यामुळे मला कामाची नितांत गरज आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “माझी मुले मला मदत करू इच्छितात, पण मला त्यांच्याकडून पैसे घ्यायचे नाहीत. मला असे जीवन जगायचे आहे ज्यात मी इतरांना मदत करू शकेन. आजच्या पिढीतील कलाकारांना मी भूतकाळात केलेले काम माहीतही नाही. माझ्या काळात मला २१ वर्षांच्या तरुणीची भूमिकाही ऑफर होत असे. मी कामासाठी कोणाकडे भीक मागत नाही. जर कोणाला ‘अनिता कन्वल’ कोण आहे किंवा तिने कशा प्रकारचे काम केले आहे हे माहीत नसेल, तर मी त्यात काहीही करू शकत नाही. मी ऑडिशनसाठी जाते, कास्टिंग डायरेक्टरांना भेटते, पण काम मिळवण्यात यश येत नाहीये.”