ना एकही फोटो, ना व्हिडीओ; जगातील पहिली वेबसाईट कशी होती? आजही करु शकता Visit
जगातील पहिली वेबसाईट कोणती होती? ६ ऑगस्ट १९९१ रोजी टिम बर्नर्स-ली यांनी सुरू केलेल्या 'info.cern.ch' या पहिल्या वेबसाईटचा रंजक इतिहास आणि तिचे स्वरूप जाणून घ्या

आजच्या डिजीटल युगात आपण सोशल मीडिया आणि इंटरनेटशिवाय जगण्याची कल्पनाही करु शकत नाही. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपण्यापूर्वीपर्यंत आपण मोबाईलवर शेकडो वेबसाईट्स आणि ॲप्स वापरत असतो.

सध्या इंटरनेटवर अब्जावधी वेबसाईट्स उपलब्ध आहेत, पण जगातील सर्वात पहिली वेबसाईट कोणती होती, ती कोणी तयार केली आणि आज ती अस्तित्वात आहे का? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

जगातील पहिल्या वेबसाईटचे नाव "info.cern.ch" असे होते. ६ ऑगस्ट १९९१ रोजी ब्रिटीश शास्त्रज्ञ 'टिम बर्नर्स-ली' यांनी ही वेबसाईट लाइव्ह केली होती. त्यावेळी ते 'CERN' (युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च) या नामांकित वैज्ञानिक संस्थेत कार्यरत होते.

जगभरातील शास्त्रज्ञांमध्ये माहितीची देवाणघेवाण अधिक सुलभ व्हावी, या उद्देशाने त्यांनी 'वर्ल्ड वाइड वेब' (WWW) ची संकल्पना विकसित केली, जी पुढे जाऊन आधुनिक इंटरनेटचा पाया ठरली. आजच्या रंगीबेरंगी आणि ॲनिमेशनने नटलेल्या वेबसाईट्सच्या तुलनेत जगातील पहिली वेबसाईट अत्यंत साधी होती.

या वेबसाईटवर कोणतेही ग्राफिक्स, फोटो किंवा व्हिडिओ नव्हते. यात केवळ मजकूर (Text) आणि काही हायपरलिंक्स होत्या. लोकांना 'वर्ल्ड वाइड वेब' म्हणजे काय, त्याचा वापर कसा करावा आणि स्वतःची वेबसाईट कशी तयार करावी, याबद्दल तांत्रिक माहिती देणे हाच या वेबसाईटचा मुख्य उद्देश होता.

तब्बल ३५ वर्षांनंतरही ही ऐतिहासिक वेबसाईट आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे. 'CERN' ने या वेबसाईटला मूळ स्वरूपात जतन करून ठेवले आहे. तुम्ही आजही info.cern.ch या यूआरएल (URL) वर जाऊन इंटरनेटच्या इतिहासाचे हे पहिले पाऊल अनुभवू शकता.