सर्वात मोठी बातमी, अजित पवार भाजपच्या ट्रॅपमध्ये फसले? पाहा दादा काय म्हणाले?

| Updated on: Apr 24, 2024 | 6:37 PM

अजित पवार यांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेणं म्हणजे ते भाजपच्या ट्रॅपमध्ये फसल्याचा दावा विरोधकांकडून केला जातो. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला असतं, त्यांनी आपलं रोखठोक मत मांडलं. अजित पवार यांनी याचबरोबर अशा विविध राजकीय घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली.

सर्वात मोठी बातमी, अजित पवार भाजपच्या ट्रॅपमध्ये फसले? पाहा दादा काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी अजित पवारांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाची उत्तरे दिली. अजित पवार हे गेल्यावर्षी जुलै महिन्यात सत्तेत सहभागी झाले. त्यांचा सत्तेत जाण्याचा निर्णय माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना पटणारा नव्हता. पण तरीही आपल्या काकांच्या विरोधात जावून त्यांनी हा निर्णय घेतला. अजित पवार यांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेणं म्हणजे ते भाजपच्या ट्रॅपमध्ये फसल्याचा दावा विरोधकांकडून केला जातो. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला असतं, त्यांनी आपलं रोखठोक मत मांडलं. अजित पवार यांनी याचबरोबर अशा विविध राजकीय घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली.

“कुणाला काय बोलायचं ते बोलू द्या. आम्ही कुणाच्या ट्रॅपमध्ये फसलो नाही. अजित पवार कुणाच्या ट्रॅपमध्ये फसणारा माणूस नाही. माझं रोखठोक काम असतं. असलं लेचंपेचं काम माझ्याकडे नाही. राजकीय जीवनात वाटलं तेव्हा राजीनामा टाकला आणि निघून गेलो. जे काही चित्र रंगवलं जातं, सांगितलं जातं ते धांदात खोटं आहे. त्यात तसूभर, नखाच्या एवढंही सत्य नाही”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

सुनेत्रा पवारांचं नाव भाजपने सुचवलं का?

“हा धादांत खोटा प्रचार आहे. कुणी कुणाचं नाव सुचवलं नाही. जागा वाटप झाल्यावर कुणाला उमेदवारी द्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फक्त परभणीची जागा आम्हाला मिळाली होती. सोशल इंजिनियरिंगसाठी आम्ही ती जागा जानकर यांना दिली. तो निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला. तिथे आधी आम्ही राजेश विटेकरांना तयारीला लागायला सांगितलं होतं. नंतर आम्हाला दोन पावलं मागं घ्यावी लागली. जानकरांसाठी आम्ही आमच्या उमेदवाराला थांबवलं”, असं उत्तर अजि पवारांनी दिलं.

सुनेत्रा पवार उमेदवारी राष्ट्रवादीचाच निर्णय होता?

“होय, हा आमचा निर्णय होता. भाजपचा काही संबंध नाही. कारण नसताना गैरसमज पसरविला जात आहे. बारामतीचा जो निर्णय आहे तोच आम्ही घेतला”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

दोघांची राजकीय कारकिर्द पणाला लागली ना?

“निवडणूक म्हटल्यावर यश अपयश असतं. आमच्या घरात आजच झालेलं नाही. फार पूर्वी वसंतदादा पवार हे आमचे थोरले काका… आमचं अख्खं घराणं शेतकरी कामगार पक्षाचं होतं नवीन पिढीला माहीत नाही. नवीन बारामतीकरांना माहीत नाही. जुन्या बारामतीकरांना माहीत आहे. तेव्हा एकटे पवार साहेब काँग्रेससाठी काम करत होते. अख्खं घराणं आजी आजोबा, सर्व त्यांची मुली, मुलं सर्व मेंबर हे शेतकरी कामगार पक्षाचं काम करत होते. ही इतिहासाची नोंद आहे. १९६२चा काळ होता”, असं अजित पवार म्हणाले.