5 हजार कोटींचा मालक असलेल्या BJP आमदाराने रस्त्यावर भीक का मागितली? अखेर कारण आलं समोर

घाटकोपर पूर्व मतदारसंघाचे आमदार पराग शहा हे मुंबईतील एक प्रसिद्ध आणि संपन्न राजकारणी म्हणून ओळखले जातात. पाच हजार कोटींहून अधिक मालमत्तेचे मालक असलेल्या या आमदाराने एक संपूर्ण दिवस भिकाऱ्याच्या गणवेशात भीक मागितली. आता या मागचे कारण त्यांनी सांगितले आहे.

5 हजार कोटींचा मालक असलेल्या BJP आमदाराने रस्त्यावर भीक का मागितली? अखेर कारण आलं समोर
पराग शहा
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 14, 2026 | 2:48 PM

५ हजार कोटींची संपत्ती असलेले भाजप आमदार पराग शहा भिकाऱ्याच्या वेशात घाटकोपरच्या रस्त्यावर फिरताना दिसले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पराग शहा यांनी असे का केले? याबाबत चर्चा सुरु झाली. आता घाटकोपरमध्ये भिकाऱ्याच्या वेशात फिरण्यामागचे कारण स्वत: पराग शहा यांनी सांगितले आहे.

पराग शहा चक्क भिकाऱ्याच्या वेशात रस्त्यावर फिरत होते. घाटकोपर स्टेशन परिसरात ते वेश बदलून फिरताना दिसले. गुरूंच्या आदेशानंतर हा प्रयोग केल्याचं पराग शहांनी म्हटले आहे. पैसा आणि पद नसताना लोक कसा मान देतात, हे जाणून घेण्याचा त्यांचा उद्देश होता. भिकाऱ्याच्या वेशात गेल्यावर अनेकांनी पराग शहांना ओळखलंच नाही. “लोक तुमच्या रूपाला ओळखतात, तुम्हाला नाही” असे स्पष्ट मत पराग शहा यांनी मांडले.

“एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला भीक देतोय”

भिकाऱ्याच्या अवतारात फिरताना कुणी २० रुपये दिले तर कुणी खाण्याचं साहित्य दिलं. पैसे नसतानाही समोसेवाल्याने प्रेमाने समोसा दिल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. मुंबईकरांच्या माणुसकीचा वेगळा अनुभव आल्याचं शहा यांनी सांगितलं. एका व्यक्तीने दिलेले २० रुपये पराग शहा यांनी महिला भिकाऱ्याला दिले. “एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला भीक देतोय” अशी त्या महिला भिकाऱ्याची प्रतिक्रिया होती. भिक मागून पराग शहांकडे एकूण ६४ रुपये जमा झाले होते. हे करत असताना एका पुलावाल्याने आनंदात पुलाव दिल्याने माणुसकी दिसली असे देखील त्यांनी सांगितले.

रोज ३०० जणांना जेवण देणाऱ्या ठिकाणीही स्टाफने त्यांना ओळखलं नाही. वेश बदललेल्या शहांना तिथे डाळ-भात देण्यात आला. आपण सगळे एकच आहोत. पैसा आणि वैभव हे देवाची देणगी. मात्र माणसांशी जोडून राहणं गरजेचं असा संदेश पराग शहा यांनी दिला.

मुंबईतील गरिबांची जबाबदारी केवळ सरकारची नाही, समाजाचीही असल्याचे मत त्यांनी मांडले. “शहरात कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये” म्हणून पराग शहा स्वतःचे खर्च कमी करून गरजूंना मदत करण्याचं आवाहन केले आहे. हा प्रयोग राजकारणासाठी केला नसल्याचं पराग शह यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. या व्हिडीओमुळे त्यांना ट्रोल करणाऱ्यांवर त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us