श्रीकांत शिंदे यांच्या मंत्रिपदाची चर्चा सुरू होताच क्लिप कशी आली? या मागे दिल्ली की महाराष्ट्रातील नेत्यांचा हात? राजकीय विश्लेषकांचा दावा काय?
मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांच्या पुष्ट्यर्थ पुरावा म्हणून एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यावर आता ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक यांनी आपली भूमिका मांडली आहे.

राज्याच्या राजकारणात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले. त्यानंतर कथित ऑडिओ क्लिपमध्ये एक महिला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 500 कोटी रुपये दिल्याचं म्हणत आहे. यावरुन राज्यातील राजकारण पेटले आहे. आता यावर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक यांनी आपली भूमिका मांडली आहे.
ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी भाजपमध्ये आणि महायुती सरकारमध्येही सर्व काही आलबेल नसल्याचे म्हटले आहे. “एक आपण लक्षात घेतलं पाहीजे महायुतीकडे भक्कम संख्याबळ आहे. पण ऑडिओ क्लीपमुळे महायुतीत सर्व काही आलबेल नाही असं वाटयला लागलेलं आहे. महायुतीत सर्व काही ठिक नाही हेच काही ऑडिओ क्लीपमधून समोर येत आहे. श्रीकांत शिंदेंचे नाव दिल्लीत मंत्रीपदासाठी सुरु होते ही क्लीप दिल्लीतून बाहेर आली की राज्यातील नेतृत्वाकडून हा प्रश्न आहे? भाजपची अशी इच्छा आहे एकनाथ शिंदेंनी छोटा भाऊ बनून राहावे. भाजपमध्येही अंतर्गत विसंवाद आहे असे वाटायला लागलेय. उद्धव ठाकरेंचे खासदार फोडल्यामुळे शिंदेंचे दिल्लीत वजन वाढले, राज्यातील सत्तेत मोठा वाटा मिळवण्याचा आग्रह. भाजपमध्ये आणि महायुती सरकारमध्येही सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षांच्या सरकार कोसळण्याच्या भाकितांमागे भाजप किंवा शिंदेंच्या शिवसेनेकडून मिळणारे संकेत असण्याची शक्यता आहे, असे ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी विश्लेषण केले आहे.
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक रवीकिरण देशमुख यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, राजकारणामध्ये कुठलीही गोपनीय गोष्ट बाहेर पडली की त्याच्यावर खूप चर्चा होते, वाद निर्माण होतात. राजकारणामध्ये जाहीरपणे कोणी जेव्हा बोलतं तेव्हा त्याच्या मागे उद्दिष्ट स्पष्ट दिसतं, व्यक्ती स्पष्ट दिसते. इथे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती आहे. या ऑडिओ क्लिपमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. ही ऑडिओ क्लिप बाहेर आणली कोणी? का आणली? याचा काही थांगपत्ता लागत नाहीये. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, विशेषतः आशिष शेलार यांनी, ही एआय क्लिप असल्याचं म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले, दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे नेते रामदास कदम स्पष्टपणे म्हणाले, एआय वगैरे काही नाही. ही अस्सल आहे आणि आमच्या नेत्याला अडचणीत आणण्यासाठी केलेलं आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये पाचशे कोटींच्या रकमेचा उल्लेख झालेला आहे. हे पैसे कोण कुणाला देणार होतं आणि ते कसे देणार होतं? येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या ऑडिओ क्लिपचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपचे नेते शिवसेनेवर आरोप करतायत, शिवसेनेचे नेते भाजपवर आरोप करतायत. महायुती अभेद्य आहे, महायुती सत्तेसाठी एकदम एकत्रितरीत्या आलेला हा जोड आहे. दोन्ही पक्षांमध्ये समन्वय राहिलेला नाही. दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड मतभेद निर्माण झालेले आहेत. ही त्याची झलक आहे आणि पडद्यामागे खूप काही सुरू आहे. या सरकारला प्रचंड मोठं पाठबळ आहे. २३२ ते २३५ सदस्यांचं यांना समर्थन आहे. सरकारला तसा काही धोका नाही. प्रश्न आहे महायुतीमधल्या समन्वयाचा. ज्या समन्वयाने यांनी २०२२ पासून राजकारण केलं, तो समन्वय नष्ट होईल. एकमेकांची उणीदुणी काढणं, जाहीररीत्या त्याची वाच्यता करणं, हे महायुतीला अपकारक ठरेल असं वातावरण निर्माण होऊ शकतं. अशा वेळेला विरोधी पक्ष फायदा घ्यायला लागतो. हे मोठं नुकसान मात्र टाळता येऊ शकणार नाही.