अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला (bjp) अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं पत्रं देण्यात आलं होतं. त्यावरून उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी राज ठाकरे (raj thackeray) आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी आज पत्रं दिलं हे मी पहिल्या पत्राच्याबाबतीत म्हटलं होतं. पहिला मुद्दा समजला. दुसरा कोणाच्या कळा, कोणाचे बाळंतपण आणि कोणाच्या मांडीवर बाळ हे सगळ्यांना कळतं आहे. भाजप आणि ईडी सरकारला मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर आणि भोंगे लागतात. पत्रं लिहिणाऱ्यांना एक विनंती आहे. आपल्या हातून फॉस्कॉन जाऊन पॉपकॉर्न आला आहे, त्याबद्दलही एक पत्रं लिहावं, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता लगावला आहे.
किशोरी पेडणेकर मीडियाशी संवाद साधत होत्या. यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार हल्ला चढवला. भाजप फक्त जांबोरी मैदान मिळवून सोहळे साजरे करू शकते. ते मैदान मिळवू शकतात. मैदान मारू शकत नाहीत, असा हल्ला किशोरी पेडणेकर यांनी चढवला.
रिफायनरीच्या मुद्द्यावर शिवसेना कायम स्थानिकांबरोबर राहिली आहे. शिवसेना आपली भूमिका बदलत नाही. तिथल्या लोकांना काय हवे यानुसार आम्ही निर्णय घेतो. त्याला बदलती भूमिका म्हणत नाही, अशी चपराक त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावली.
दोन ठिकाणी एकाच वेळी गोष्टी घडल्या. निवडणुकीतून माघार आणि ग्रामपंचायत निवडणूक. माघार म्हणत असाल तर पंढरपूर, देगलूर, कोल्हापूरात यांनी उमेदवार दिले होते. एका ठिकाणी जिंकलात, दोन ठिकाणी हरलात.
तुम्ही सगळे प्रयत्न केले पक्षाचे नाव गोठवले, धनुष्यबाण गोठवले. सरपंचाच्या निवडणुकीत फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर यश मिळाले. तुमच्याकडे महासत्ता असताना हे होऊ शकले नाही. त्यामुळे तुमच्याकडून डिवचण्याचा प्रयत्न होणारच होता, असा चिमटाही त्यांनी काढला.
तुम्ही शिवसेनेला संपवू इच्छित होतात. ते होऊ शकले नाही, असंही त्यांनी सांगितलं. चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवल्याने लोकांमध्ये चीड आहे. निवडणूक आयोगाला तरी असे करण्याची काय गरज होती असा प्रश्न निर्माण होईल, असं त्या म्हणाल्या.