सव्वा रुपया नाही तर 1 हजार कोटींचा दावा ठोकणार, प्रवीण दरेकर आक्रमक

मुंबै बँकेत कथित स्वरुपात अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी, सखोल चौकशी करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले होते.

सव्वा रुपया नाही तर 1 हजार कोटींचा दावा ठोकणार, प्रवीण दरेकर आक्रमक
मुंबै बँकेची बदनामी करणाऱ्यांविरोधात दावा दाखल केल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली


मुंबई: महाराष्ट्रात अब्रु नुकसानीच्या दाव्यांचं पीक आता जोमात आलेलं दिसत आहे. कारण, आधी किरीट सोमय्या, नंतर संजय राऊत यांच्याकडून चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयांच्या अब्रु नुकसानीचा दावा आणि आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मविआ सरकारमधील काही नेत्यांवर तब्बल 1000 कोटींच्या अब्रु नुकसानीचा दावा केला आहे. मुंबै बँकेत कथित स्वरुपात अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी, सखोल चौकशी करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले होते. प्रवीण दरेकर हेच या बँकेचे संचालक असल्याने त्यांच्यावरही आरोप झाले. त्यामुळेच अखेर प्रवीण दरेकर यांनी कोर्टात अब्रु नुकसानीचा दावा ठोकला आहे. ( Mumbai Bank defamation case: Praveen Darekar claims Rs 1,000 crore defamation suit against MVA government leaders )

नक्की काय आहे प्रकरण?

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबै बँकेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नुकतंच राज्य सरकारच्या सहकार विभागाने सखोल चौकशीचे आदेश दिले. जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती सरकारकडून करण्यात आली. हेच नाही, तर चौकशीचा कालावधीही ठरवून देण्यात आला. अवघ्या 3 महिन्यात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचा निर्देश सहकार विभागाने दिला. या बँकेच्या संचालकपदी आहेत राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर. त्यामुळे दरेकरांना टार्गेट करण्यासाठीच चौकशी लावली गेल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. यावेळी प्रवीण दरेकरही चांगलेच संतापले, आणि त्यांनी पुणे जिल्हा बँक, राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्यांची चौकशी करा अशी मागणी केली.

प्रवीण दरेकर नक्की काय म्हणाले?

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि मुंबै बँकेचे संचालक प्रवीण दरेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आणि मुंबै बँकेची बदनामी करणाऱ्यांविरोधात दावा दाखल केल्याची माहिती दिली, ते म्हणाले,
‘मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यातील प्रगत आणि उत्तम बँक आहे. बँकेला इथंपर्यंत आणण्यात माजी अध्यक्ष असतील, संचालक असतील यांचं योगदान आहे. मुंबईच्या सहकाराचं हे वैभव आहे. या लौकिकाला काळिमा फासण्याचं काम वेगवेगळ्या टप्प्यावर मुंबई जिल्हा बँकेच्या संदर्भात झालं आहे. शेवटी, वैयक्तिक बदनामीबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, आमची वैयक्तिक बदनामी करा, राजकीय बदनामी करा, परंतू, ज्या वेळेला एखाद्या आर्थिक संस्थेची बदनामी होते, त्यावेळेला त्यांच्या डिपॉझिटरवर परिणाम होतो, ग्राहकांवर परिणाम होतो, त्याच्यावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांचं पोट त्याच्यावर असतं. उद्या जर एखाद्या बातमीने किंवा एखाद्या स्टेटमेंटने बँक अडचणीत आली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? ‘

मुंबै बँकेच्या बदनामी प्रकरणी अब्रु नुकसानीचा दावा

मुंबै बँकेवर अनियमिततेचे आरोप आणि त्यानंतर चौकशीचे आदेश आल्यानंतर आता संचालक प्रवीण दरेकर यांनी कोर्टात दार ठोठावलं आहे. त्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की,’ मुंबई बँकेच्या संदर्भात, लौकिकास कुठेही गालबोट लागू नये. कारण, 1200 कोटीवरुन 10 हजार कोटींच्या टप्प्यावर मेहनतीने बँक आम्ही आणली आणि अशावेळेला कुणीही उठसूट स्टेटमेंट देतं, वाटेल ते छापून आणेल, म्हणून त्यासंदर्भात आम्ही निर्णय केला. आणि कालच याठिकाणी हायकोर्टामध्ये सूट नंबर 21909 आणि 21935 या नोंदणी क्रमांकाप्रमाणे त्या ठिकाणी दावा दाखल झालेला आहे. तशाप्रकारचं आता सर्कुलेशन होईल. आणि या मुंबई बँकेच्या बदनामीच्या संदर्भात कोर्टाच्या माध्यमातून जबाबदार लोकांवर कारवाईची आमची मागणी असेल.’

सव्वा रुपया नाही तर 1 हजार कोटींचा दावा

राज्य सरकार विरुद्ध भाजप असं अब्रु नुकसानीच्या दाव्यांची साखळी सध्या सुरु असलेली पाहायला मिळते आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर चंद्रकांत पाटलांवर अवघ्या सव्वा रुपयाच्या अब्रु नुकसानीचा दावा ठोकला होता. या दाव्याची सर्वत्र चर्चाही झाली. मात्र, मुंबै बँक प्रकरणी आता प्रवीण दरेकर यांनी 1 हजार कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकला आहे. दाव्याबद्दल सांगताना त्यांनी सव्वा रुपयांच्या दाव्याचाही उल्लेख केला. दरेकर म्हणाले, ‘1 हजार कोटींची दावा आम्ही याठिकाणी दाखल केलेला आहे. त्यांसंदर्भात असणारी स्टॅम्प ड्युटी, सर्व सोपस्कार आम्ही पूर्ण केलेले आहेत. 1 हजार कोटी, म्हणजे सव्वा रुपया वगैरे नाही, 1 हजार कोटींचा दावा आम्ही दाखल केलेला आहे.’

पाहा नक्की काय म्हणाले प्रवीण दरेकर:

 

हेही वाचा:

Kirit Somaiya vs Hasan Mushrif : आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात, अंबाबाईच्या दरबारात सोमय्यांचा एल्गार

आधी राणे म्हणाले, मुख्यमंत्री आलेच पाहिजेत असं काही नाही, आता चिपी विमानतळाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्तेच, राणे-ठाकरे एकाच मंचावर

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI