Nitesh Rane : मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार, नितेश राणेंचा दावा; शिवसेना ‘ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ झाल्याचं टीकास्त्र

| Updated on: May 12, 2022 | 11:49 PM

14 मे ला सभा होणार आहे. इतके टोमणे ऐकायला मिळणार आहेत की कानातून रक्त येणार आहे', असा जोरदार टोलाही नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावलाय.

Nitesh Rane : मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार, नितेश राणेंचा दावा; शिवसेना ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाल्याचं टीकास्त्र
नितेश राणे, आमदार, भाजप
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : राज्याच्या राजकारणात आता महापालिका निवडणुकांचे (Municipal Election) वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसून कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी मुंबई महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकणार असा दावा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलाय. त्याचबरोबर शिवसेनेवरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. हिंदुत्व आणि शिवसेना काही संबंध राहिला नाही. आता बॅनर लावले आहेत. त्यांना सर्टिफिकेट द्यावं लागत आहे, लोकांना सांगावं लागत आहे. 14 मे ला सभा होणार आहे. इतके टोमणे ऐकायला मिळणार आहेत की कानातून रक्त येणार आहे’, असा जोरदार टोलाही नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावलाय. चारकोपमध्ये भाजप कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर आणि पक्षप्रवेश पार पडला. त्यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, आमदार नितेश राणे उपस्थित होते.

शिवसेना आता ‘ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’

आपण ज्या शिवसेनेवर प्रेम करायचो ती शिवसेना आता राहिली नाही. आता फक्त ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे, जिकडे फक्त प्रॉफिट आणि लॉस मोजला जातोय. जुन्या शिवसैनिकांना काही दिलं का? सुधीर जोशी जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या घरातील लोकांना भेटण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. पण त्या संजय राऊतांना नवाब मलिक यांच्या घरच्यांना भेटण्यासाठी वेळ आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय. त्यांच्याकडे आता टोमणे मारणं एवढंच काम सुरु आहे. भाजप नेत्यांना पोलिसांमार्फत टार्गेट केलं जातं आहे. आम्ही गप्प बसणारे लोक नाही. आरे ला कारे करणारे कार्यकर्ते आमचे आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावं, असा इशाराही नितेश राणेंनी दिलाय.

हे सुद्धा वाचा

‘ते परिवहन नाही तर परिवार मंत्री’

नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही जोरदार टीका केलीय. ते परिवहन मंत्री नाहीत, परिवार मंत्री आहेत. चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी काय दिलं? त्यांना किती त्रास झाला. तेव्हा कुणी आलं का मदत करायला? या सरकारनं कोकणाला काय दिलं, हे विचारण्याची वेळ आलीय. जो माणूस प्रामाणिकपणे शिवसेनेला मतं देतो, पण शिवसेनेनं त्या माणसाला काय दिलं हे विचारण्याची वेळ आल्याची टीकाही नितेश राणेंनी केलीय.

‘तेव्हा आणि आताच्या शिवसेनेत जमीन आसमानचा फरक’

असंख्य लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. 12 वर्षे काँग्रेसनं आम्हाला जे दिलं नाही ते पावणे तीन वर्षात भाजपमध्ये मिळालं. तीन वर्षे आम्हाला मान सन्मान दिला. 39 वर्षे राणेसाहेब शिवसेनेत होते. आम्हीही त्याच शाळेत होतो. पण तेव्हाची शिवसेना आणि आताची शिवसेना जमीन आसमानचा फरक आहे. तेव्हाचे शिवसैनिक आणि आताच्या शिवसैनिकांमध्ये फरक आहे. मुख्यमंत्रीपदावर बसलेली व्यक्ती जेव्हा बोलली की शिवसेनेला संपवणारे स्वत: संपले. पण असं काही नाही, राणेसाहेब आज केंद्रीय मंत्री आहेत. हा मान सन्मान आम्हाला भाजपमध्ये मिळाला. तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात तेच शिवसेना संपवण्याची सुपारी घेऊन बसले आहेत, असा सूचक इशाराही नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय.