ये अंदर की बात है, राजन साळवी हमारे साथ है; नितेश राणे आणखी काय म्हणाले?

| Updated on: Oct 18, 2022 | 5:33 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न खाऊंगा, ना खाने दुंगा, अशी घोषणा दिली. त्यामुळे आता तुम्ही कितीही मोर्चे काढा. पण वाढलेल्या संपत्तीचे उत्तर वैभव नाईक यांना द्यावेच लागणार आहे.

ये अंदर की बात है, राजन साळवी हमारे साथ है; नितेश राणे आणखी काय म्हणाले?
ये अंदर की बात है, राजन साळवी हमारे साथ है; नितेश राणे आणखी काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कणकवली: भाजप नेते नितेश राणे यांनी आज शिंदे गटाचे आमदार भास्कर जाधव (bhaskar jadhav) आणि राजन साळवी (rajan salvi) यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्यासाठी भास्कर जाधव विनवण्या करत होते. पण शिंदे यांनी त्यांना नाकारलं. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. मी साक्षीदार आहे. पण नंतर याच भास्कर जाधवांनी मोदींची नक्कल केली, असं सांगतानाच ये अंदर की बात है, राजन साळवी हमारेसाथ है, असा गौप्यस्फोट नितेश राणे (nitesh rane) यांनी केला. नितेश राणे यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली. तसेच आमदार वैभव नाईक यांच्यावरही टीका केली. आता तुम्हाला उद्धव ठाकरे बरे वाटत आहेत,ते कसा वापर करून घेता आहेत हे आता कळणार नाही. रामदास कदम यांना विचारा. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यावर रामदास कदम यांच्याकडून कसं बोलवून घेतलं. आज कदम काय बोलतात ते ऐका. भास्कर जाधव, अरविंद सावंत तुम्हीही ऐका, असं नितेश राणे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

भास्कर जाधव तुम्ही नगरविकास खात्याचे केवळ राज्यमंत्रीच बनू शकलात. मुलाला फक्त जिल्हापरिषदेचा अध्यक्ष बनवलं. उलट नारायण राणे मुख्यमंत्री बनले. एका मुलाला खासदार केलं. दुसऱ्या मुलाला आमदार बनवलं, असा टोलाही त्यांनी लगावला.

वैभव नाईक यांची एसीबीकडून चौकशी झाली हा मुद्दा आहे. वैभव नाईक यांची संपत्ती कशी वाढली? वैभव नाईक यांनी सोंगाड्या सारखा नंगानाच केला. आपण चुकीचं काही केलं नाही हे वैभव नाईक यांनी एसीबीला सांगितलं पाहिजे.

माझ्याकडे या प्रकरणातील काही पुरावे आहेत. तेच आज जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला दाखवायचे आहेत. 2009मध्ये हा माणूस काय होता. आज त्याची संपत्ती कशी वाढली? आमचीही ईडीची चौकशी झाली, पण आम्ही मोर्चे काढत बसलो नाही, असं ते म्हणाले.

वैभव नाईक निवडणुकीचे प्रतिज्ञापत्रं दाखवत आहेत. त्यांचं कुटुंब गॅस एजन्सी चालवणारं साधं कुटुंब होतं. 2009 ते 2014 दरम्यान एक कोटीवरून त्यांची संपत्ती सात कोटी झाली. 2014 ते 2019 दरम्यान 7 कोटीवरून 22 ते 25 कोटी संपत्ती झाली. बेनामी मालमत्तेसह 150 कोटीहून अधिक संपत्ती जमा झाली. आम्हाला शिव्याशाप देण्याऐवजी एसीबीला उत्तर द्या. तुमच्या आणि एसीबीच्या मध्ये आम्हाला आणू नका, असं ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न खाऊंगा, ना खाने दुंगा, अशी घोषणा दिली. त्यामुळे आता तुम्ही कितीही मोर्चे काढा. पण वाढलेल्या संपत्तीचे उत्तर वैभव नाईक यांना द्यावेच लागणार आहे. भुजबळांनाही चौकशी करून आत जावं लागलं होतं. याच्यातून कोणी सुटणार नाही. नाईकांनी एसीबीला योग्य माहिती देऊन विषय संपवून टाकावा, असंही त्यांनी सांगितलं.