Tv9 EXCLUSIVE : पवारांना पवारच रोखू शकतात म्हणून सुनेत्रा पवार यांना उभं केलं? शरद पवार यांचं रोखठोक मत काय?

| Updated on: Apr 25, 2024 | 9:20 PM

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. 'टीव्ही 9 मराठी'चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. यावेळी शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.

Tv9 EXCLUSIVE : पवारांना पवारच रोखू शकतात म्हणून सुनेत्रा पवार यांना उभं केलं? शरद पवार यांचं रोखठोक मत काय?
शरद पवार यांनी आज 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली
Follow us on

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. यावेळी शरद पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातील पवार कुटुंबातील दोन महिलांमध्ये सुरु असलेल्या राजकीय लढतीबाबत महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “मला काही समजत नाही. माझा संबंध असेल तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाशी आम्ही सहमत नाहीत. सहमत नसणं हा एक भाग, पण काही धोरणं समाजाच्या आणि देशाच्या हिताचीच नाहीत. माझा आक्रोश मोदींच्या धोरणांशी संबंधित आहेत. मी बारामतीत 1967 साली पहिल्यांदा निवडणूक लढलो. त्यापासून आजपर्यंत मी कंटीन्यू जिंकत आलो आहे. फक्त मी लोकसभेत गेलो, तेव्हा विधानसभेत गेलो, राज्यसभेत गेलो त्यावेळेस विधानसभा सोडली, पण सातत्याने जिंकत आलो आहे. मी पहिल्यांदा 1967 ला निवडणूक लढवली. तेव्हापासून आजच्या तारखेपर्यंत कधी विधानसभा, कधी लोकसभा, राज्यसभा मी सातत्याने जिंकून येत आहे”, असं शरद पवार म्हणाले.

पवारांना पवारच रोखू शकतात. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना उंभ करण्यात आलंय का? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “हे आता मी कसं सांगू? लोकशाहीत कुणालाही निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी निर्णय घेतला. अजित पवार गेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत उभे होते तेव्हा ते भाजपकडून उभे नव्हते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे होते. भाजप नेते चंद्रकांत पाटील बोलले की, आम्हाला बारामतीत शरद पवारांचा पराभव करायचा आहे. त्यांची ती इच्छा आहे. त्यांनी तसा निर्णय घेतलेला दिसतोय. आनंदाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट ही आहे की, मी स्वत: उमेदवार नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

गांधी घराण्यानंतर पवार टार्गेट आहेत का?

“या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने म्हणजेच भाजपने सगळ्या मतदारसंघात प्रयत्न केले आहेत. त्यामुळे साहजिकच आहे, ही निवडणूक एक वेगळ्या पद्धतीने होईल. शेवटी मतदारांवर आमचा विश्वास आहे. ते योग्य निर्णय घेतील, अशी खात्री आहे. दिल्लीमध्ये अशी चर्चा आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अजित पवार यांना सूचना दिल्या आहेत की, बारामतीची जागा आम्हाला जिंकून आणली पाहिजे”, असं शरद पवार म्हणाले. ज्या दिवशी प्रचाराचा नारळ फोडतात त्या दिवशी मी बारामतीत प्रचाराला गेलो होतो. यानंतर मी राज्यभरात फिरतोय, असं शरद पवार म्हणाले.

मोदींची तुलना पुतिनसोबत का?

“मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी काही भाषणे केली. अल्पसंख्यांच्याबद्दल काही वक्तव्ये केली. पंतप्रधान हे पक्षाचे नसतात तर ते देशाचे असतात. देशाचा पंतप्रधान हा एखाद्या सामाजिक घटकाबद्दल वेगळी भूमिका घेणं हे मला अजिबात पसंत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलची मी भूमिका व्यक्त केली”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

“मोदींची पुतिनशी तुलना करण्याचा प्रश्न वेगळा आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ज्या पद्धतीने तुरुंगात टाकलं, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीने तुरुंगात टाकलं गेलं, हे असं होऊ शकत नाही, अशी माझी धारणा आहे. केजरीवाल यांनी दिल्लीत चांगलं काम केलं, असं दिल्लीचे लोकं सांगतात. देशाच्या राजधानीच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही आत टाकलं, याला काय म्हणायचं?”, असा सवाल पवारांनी केला.

‘नरेंद्र मोदींनी माफी मागावी’, शरद पवारांची मागणी

“नरेंद्र मोदी यांनी भाषणात राष्ट्रवादी ही भ्रष्ट लोकांची पार्टी आहे, असा शब्द त्यांनी वापरले. त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही. माझं त्यांना आवाहन आहे की, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. तुम्ही आरोप करत आहेत. या आरोपांमध्ये तथ्य असेल तर कारवाई कराल. जर नसेल तर एका पक्षाच्या संदर्भात चुकीचं वक्तव्य केलं तर माफी मागा”, असं शरद पवार म्हणाले.