Kalyan News: “एक बिहारी सबपर भारी”; महाराष्ट्राला यूपी-बिहारमधील लोकांची अत्यंत गरज, शिंदेंच्या नेत्यांचं विधान!
उत्तर भारतीय नागरिक गावी परतल्यानंतर महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. छठपूजेला आमचा पूर्ण पाठिंबा असून, या उत्सवाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, अशी भूमिकाही शिंदे गटाच्या या नेत्याने मांडली आहे.

सुनील जाधव, प्रतिनिधी: Kalyan Politics News: एकीकडे राज्यात छठपूजेवरून चांगलंच राजकारण सुरू असताना, आता शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी छठपूजेच्या कार्यक्रमादरम्यान केलेलं विधान चर्चेत आलं आहे. महाराष्ट्राला उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नागरिकांची अत्यंत गरज असल्याचं विधान मोरे यांनी केलं आहे.
“एक बिहारी सबपर भारी, एक बिहारी दोन ते तीन जणांचे काम एकटाच करतो,” असं म्हणत त्यांनी मनसेला अप्रत्यक्ष टोला लगावल्याची चर्चा आहे. उत्तर भारतीय नागरिक गावी परतल्यानंतर महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. छठपूजेला आमचा पूर्ण पाठिंबा असून, या उत्सवाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
काय म्हणाले शिवसेनेचे नेते अरविंद मोरे?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याणमधील दुर्गाडी येथील गणेश घाटावर छठपूजेचा भव्य उत्साह पाहायला मिळाला. मात्र, याच छठपूजेच्या व्यासपीठावरून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी केलेल्या विधानाने राजकीय चर्चेला तोंड फुटलं आहे. महाराष्ट्राला उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नागरिकांची अत्यंत गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मराठी-अमराठी वादाच्या काळात उत्तर भारतीय आणि बिहारी नागरिक मोठ्या संख्येने आपल्या गावी परतले होते. त्यावेळी महाराष्ट्रातील उद्योगधंदे, मिलमधील कामकाज आणि बांधकाम व्यवसायावर परिणाम झाल्याचा दावा मोरे यांनी केला. पुढे बोलताना “एक बिहारी सबपर भारी, एक बिहारी दोन ते तीन जणांचे काम एकटाच करतो,” असं विधान त्यांनी केलं.
‘मनसेला डिवचवण्याचा प्रयत्न..’
आता अरविंद मोरे यांच्या या वक्तव्याचा रोख मनसेकडे असल्याची चर्चा रंगली आहे. छठपूजा हा हिंदूंचा सण असून या उत्सवाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. उत्तर भारतीय आणि बिहारी बांधवांच्या या उत्सवासाठी आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी भूमिकाही अरविंद मोरे यांनी मांडली. त्यामुळे छठपूजेच्या कार्यक्रमातील त्यांच्या या विधानाची कल्याणच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, एकीकडे मनसे छठपुजेला विरोध करत असतानाच आता शिंदेंच्या नेत्याने असं विधान केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.