पाठीत खंजीर खुपसला ते भविष्यात युतीचा विचार! चंद्रकांत पाटलांची एकाच वेळी दोन परस्परविरोधी वक्तव्ये

| Updated on: Sep 03, 2021 | 2:18 PM

आजवर राजकारणात पाठीत खंजीर खुपसणारा एक चेहरा सर्वांना माहिती होता. मात्र, आता दुसरा चेहरा समोर येतो, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीय. पाटील यांनी आज त्याच टीकेचा पुनरुच्चार केलाय. त्याचवेळी त्यांनी भविष्यात शिवसेना-भाजप युतीबाबत महत्वाचं वक्तव्यही केलंय.

पाठीत खंजीर खुपसला ते भविष्यात युतीचा विचार! चंद्रकांत पाटलांची एकाच वेळी दोन परस्परविरोधी वक्तव्ये
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us on

अकोला : नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेपासून राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालंय. राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेना नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जातेय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच शिवसेनेवर गंभीर आरोप केलाय. आजवर राजकारणात पाठीत खंजीर खुपसणारा एक चेहरा सर्वांना माहिती होता. मात्र, आता दुसरा चेहरा समोर येतो, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीय. पाटील यांनी आज त्याच टीकेचा पुनरुच्चार केलाय. त्याचवेळी त्यांनी भविष्यात शिवसेना-भाजप युतीबाबत महत्वाचं वक्तव्यही केलंय. पाटील आज अकोल्यात बोलत होते. (Chandrakant Patil’s criticism of Shiv Sena, as well as hints about future alliance)

शिवसेनेनं आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय. त्यामुळे तुर्तास तरी शिवसेनेबरोबर युती शक्य नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. पाटील हे अकोला दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात अशक्य असं काहीही नाही. भविष्यात शिवसेनेसोबत सौहार्दाचे संबंध प्रस्थापित झाल्यास युतीचा विचारही होऊ शकतो, असंही पाटील यावेळी म्हणाले. 2014 मध्ये युती तुटूनही मंत्रिमंडळाचे गठन युतीच्या माध्यमातूनच झाल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर आमच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पितृस्थानी आहे. त्यांच्याबद्दल काढण्यात येणारे अपशब्द कदापिही सन केले जाणार नसल्याचा इशाराही पाटील यांनी यावेळी दिलाय.

राऊतांचा अमेरिकेचाही अभ्यास असू शकतो- पाटील

बेळगाव महापालिकेत 30 पेक्षाही अधिक जागा जिंकू, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या विधानाची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. बेळगाव जिंकेल असा राऊत दावा करत असतील तर त्यांचा अमेरिकेचाही अभ्यास असू शकतो, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

नारायण राणे सक्षम

कोकणात नारायण राणे समर्थकांना शिवसेनेने फोडले आहे. दोन नगरसेवकांनी समर्थकांसह काल शिवसेनेत प्रवेश केला. याकडे पाटील यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. राणे समर्थक फोडल्याची मला माहिती नाही. पण असं झालं असेल तर नारायण राणे त्याला सक्षम आहेत, असं ते म्हणाले.

सरकारलाच आरक्षण द्यायचं नाही

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा संपणार की नाही? असा प्रश्न केला असता ओबीसींना आरक्षण देणं खूप सोपं आहे. पण या सरकारला आरक्षण द्यायचंच नाहीये, असा आरोप त्यांनी केला. भाजपने परिवहन मंत्री अनिल परब यांचे नवे घोटाळे काढलेले नाहीत. जुनेच घोटाळे आहेत, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

इतर बातम्या : 

आरोपींना कडक शिक्षा होणार, काळजी करू नका, तुम्ही फक्त ठणठणीत बऱ्या व्हा; मुख्यमंत्र्यांचा कल्पिता पिंपळेंना शब्द

मोठ्या गणेश मंडपात पहिल्या दिवशी गर्दी वाढली तर… अजित पवारांनी दिला गणेश मंडळांना सूचक इशारा

Chandrakant Patil’s criticism of Shiv Sena, as well as hints about future alliance