आता आणखी एक ठाकरे राजकारणात? डिट्टो बाळासाहेबांसारखाच आक्रमक, रविवारच्या आंदोलनातच चर्चा

Shivsena: शिवाजी पार्क आणि सेना भवन परिसरात कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन झाले. या आंदोलनात सुरुवातीपासूनच राजकारणापासून लांब राहिले एक ठाकरे दिसले. ते लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

आता आणखी एक ठाकरे राजकारणात? डिट्टो बाळासाहेबांसारखाच आक्रमक, रविवारच्या आंदोलनातच चर्चा
Thackeray brothers
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 13, 2026 | 8:01 AM

मुंबईत रविवारी 11 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क आणि सेना भवन परिसरात कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन झाले. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गट आणि मनेसेचे कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेत असताना ठाकरे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आदित्य ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरेही सेना भवन परिसरात दाखल झाले. त्यानंतर आता सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे की ठाकरे कुटुंबातील आणखी एक चेहरा आता राजकारणाच्या मैदानात उतरणार का?

तेजस ठाकरे यांची अलीकडील आंदोलनातील सक्रिय भूमिका पाहून हा प्रश्न आता जोरदार चर्चेत आहे. आतापर्यंत वन्यजीव संशोधन आणि जैवविविधतेच्या क्षेत्रात काम करणारे म्हणून ओळखले जाणारे तेजस, रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी झालेल्या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. यामुळे ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य सक्रिय राजकारणात येण्याची शक्यता आहे का, याबाबत चर्चा रंगली आहे.

Loading...

उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आदित्य ठाकरे यांचे बंधू असलेले तेजस ठाकरे प्रामुख्याने वन्यजीव संशोधन आणि जैवविविधतेशी संबंधित कामांसाठी ओळखले जातात. आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थी राजकारणापासून निवडणुकीच्या राजकारणापर्यंत सक्रिय भूमिका घेतली, मात्र तेजस ठाकरे यांची सार्वजनिक प्रतिमा तुलनेने राजकारणापासून दूर राहिलेल्या व्यक्तीचीच राहिली आहे. त्यामुळे आता त्यांना आंदोलनात पाहून सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत.

तेजस ठाकरे हे यापूर्वीही काही राजकीय कार्यक्रमांमध्ये उपस्थिती राहिले होते. त्यामध्ये अनेकदा ते पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित असलेले दिसले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत दिसले होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आदित्य ठाकरे यांच्यासोबतही त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण तुरुंगातून सुटल्यानंतर मातोश्रीला गेले होते, त्यावेळीही तेजस ठाकरे तिथे दिसले. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबतचा त्यांचा व्हिडिओही वायरल झाला होता. दसरा मेळावा आणि पक्षाच्या वर्धापनदिनी अनेकदा ते मंचाच्या समोर बसलेले पाहिले गेले. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येऊन पहिल्यांदा सभा घेतली, तेव्हाही तेजस ठाकरे उपस्थित होते. मुंबई महापालिकेच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासोबत शाखा भेटीच्या दौऱ्यात ते सहभागी झाले होते. NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर शिवाजी पार्कात झालेल्या आंदोलनातही ते काळ्या रंगाचे टी-शर्ट घालून सहभागी झाले होते. आता रविवारी झालेल्या आंदोलनात त्यांना पाहून चर्चांना उधाण आले आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us