ठाकरे गटाचे 12 ते 13 आमदार एकनाथ शिंदे यांच्याच नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्याही संपर्कात; उदय सामंत यांचा मोठा दावा

| Updated on: Nov 13, 2022 | 5:11 PM

शिवसेनेच्या संस्थापकांपैकी एक खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

ठाकरे गटाचे 12 ते 13 आमदार एकनाथ शिंदे यांच्याच नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्याही संपर्कात; उदय सामंत यांचा मोठा दावा
उदय सामंत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

रत्नागिरी: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आमदार भास्कर जाधव आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचं भाकीत वर्तवलं आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला आहे. मात्र, शिंदे गटानेच नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्याकडे 170 आमदारांचं संख्याबळ आहे. ठाकरे गटातील अजून 12 ते 13 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत, असा दावा उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ठाकरहे गटातील 12 ते 13 आमदार आमच्या संपर्कात असल्याने ही संख्या 182 वर जाणार आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांचा प्रश्नच येत नाही. निवडणुका वेळेवरच होतील, असं सांगतानाच आपल्याकडील आमदार टिकून राहावेत म्हणून अशी विधाने केली जात आहे, असा टोला उदय सामंत यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

प्रत्येक फुटीर गटात एक शिंदे असतोच, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. राऊत यांच्या या विधानाचा त्यांनी समाचार घेतला. हे करण्याएवढे आम्ही बालवाडी किंवा शाळेत जात नाही. आम्ही देखील चार चार वेळा निवडून आलो आहोत. आमच्यासोबत 50 सीनियर आमदार आहेत. त्यामुळे अशा विधानांनी कोणी विचलीत होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेच्या संस्थापकांपैकी एक खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठीच त्यांनी बेताल विधानं करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असं त्यांनी सांगितलं.

अमोल कीर्तिकर तिकडे राहिले आणि गजानन कीर्तिकर इकडे आले या कौटुंबिक गोष्टीवर मला बोलायचं नाही. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, गजानन कीर्तिकर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा पक्ष प्रवेश रखडला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षप्रवेशाचा निर्णय घेतात. तसं मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे योग्यवेळी निर्णय घेतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.