तो अभिजीत दीपके…उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्यात CJP वर मोठं विधान; थेट नाव घेऊन भाजपावर हल्लाबोल!
सुरुवातीला आपल्या भाषणात बोलताना त्यांनी अभिजीत दीपकेंचा उल्लेख केला. या अभिजीत दीपके यांनी सत्ताधाऱ्यांच्या नाकी-नऊ आणले आहेत, अशा आशयाचे विधान केले.

Uddhav Thackeray Speech : उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात सत्ताधारी भाजपा, शिंदे गटावर सडकून टीका केली. देशात सध्या सुरू असलेल्या आंदोलनांचा उल्लेख करून त्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं. देशात तरुणांमध्ये असंतोष आहे, असं म्हणत सत्ताधाऱ्यांना फळ मिळणार, असं भाकित उद्धव ठाकरेंनी केलं. यावेळी भाषणादरम्यान एकूण दोन वेळा सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपकेंचा उल्लेख केला. सध्या रस्त्यावर उतरलेले तरुण हे नक्षलवादी नसून क्रांतीकारी आहेत, असे म्हणत त्यांनी सीजेपी तसेच तरुणांच्या आंदोलकांना पाठिंबा दिला.
अभिजीत दीपकेंविषयी काय म्हणाले?
सुरुवातीला आपल्या भाषणात बोलताना त्यांनी अभिजीत दीपकेंचा उल्लेख केला. या अभिजीत दीपके यांनी सत्ताधाऱ्यांच्या नाकी-नऊ आणले आहेत, अशा आशयाचे विधान केले. त्यानंतर बोलताना सीजेपीच्या पहिल्या आंदोलनाचाही त्यांनी उल्लेख केला. ‘सीजेपीचे आंदोलन सुरू होते. त्या पहिल्या आंदोलनात मी अभिजीत दीपके आणि तरुण आंदोलकांची भेट घ्यायला गेलो होतो. तिथे कोणाचं डोकं फुटलं होतं, कोणाच्या अंगावर वळ होते. एक मुलगी होती, तिचे कपडे फाडलेले होते. त्यांच्या जखमा पाहून मी घरी जा असं बोललो. पण मेलो तरी बेहत्तर पण आता माघार नाही, असं त्यांनी सांगितले. मोदीजी, अमित शाह हे 12 वर्षांचं संचित आहे. तुम्ही 12 वर्ष देशाला छळलं आहे,’ असं ठाकरे म्हणाले.
आंदोलनातील नक्षली नव्हेत तर…
तसेच, तुम्ही सगळ्यांची आर्थिक वाट लावली आहे. तुम्हाला हे फळ चाखावंच लागणार आहे. जंतर-मंतरवर आंदोलन करणारी मुलं चांगल्या घरातील आहे. मला तिथे छोटी मुलगी भेटली. खूप लहान होती. त्यांच्यासोबत आई-वडीलही होते. तरुणांच्या या आंदोलनात मुलांना घेऊन आईवडील उतरले. त्यांची निर्भर्त्सना करण्यात आली. त्यांना दिमागी नक्षल म्हणण्यात आले, हे नक्षली नसून क्रांतीकारी आहेत, असंही यावेळी ठाकरे म्हणाले.