Dasara 2026: यंदा रावण दहन किती वाजता? मुंबई, पुण्यासह पाहा शहरानुसार पूजा मुहूर्त आणि पंचांग!
दसरा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा दसरा कधी साजरा केला जाणार, पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता आणि रावण दहन किती वाजता होणार, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. चला तर मग मुंबई, पुण्यासह देशातील प्रमुख शहरांमधील विजय मुहूर्त आणि रावण दहनाच्या वेळा जाणून घेऊया.

दसरा म्हणजेच विजयादशमीचा सण यंदा मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून रावण दहन केले जाते. तसेच दुर्गा देवीने महिषासुराचा वध केल्याचा विजयही या सणातून साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी पूजा, शस्त्र पूजन आणि विजय मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. मात्र, शहरानुसार पंचांगातील वेळांमध्ये फरक असू शकतो. त्यामुळे दसऱ्याची पूजा कधी करावी, विजय मुहूर्त कोणता आणि रावण दहन किती वाजता होणार, याबाबत सविस्तर जाणून घ्या.
कधी आहे दसरा?
या वर्षी दसरा मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये विजयादशमीचे धार्मिक विधी बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी केले जाणार आहेत.
कधी सुरू होणार दशमी तिथी?
नवी दिल्लीच्या पंचांगानुसार, दशमी तिथी २० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी सुरू होईल आणि २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजून ११ मिनिटांनी संपेल. तिथी दोन दिवसांमध्ये येत असली, तरी बहुतांश भारतात २० ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाईल.
शहरानुसार विजय मुहूर्ताचे वेळापत्रक
विजयादशमीच्या दिवशी विजय मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. या काळात पूजा आणि शुभ कार्ये करणे फलदायी मानले जाते. शहरानुसार विजय मुहूर्ताच्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत.
मुंबई दुपारी २:१९ ते ३:०६
पुणे दुपारी २:१६ ते ३:०२
नवी दिल्ली दुपारी १:५९ ते २:४५
बंगळुरू दुपारी २:०२ ते २:४९
चेन्नई दुपारी १:५२ ते २:३९
हैदराबाद दुपारी १:५७ ते २:४४
कोलकाला दुपारी १:१७ ते २:०३
जयपूर दुपारी २:०६ ते २:५१
चंदीगड दुपारी २:०० ते २:४६
दसऱ्याला रावण दहन किती वाजता होणार?
दसऱ्याच्या दिवशी रावण दहन हा प्रमुख सोहळा असतो. साधारणपणे सूर्यास्तानंतर रावण दहन होते. मुंबईमध्ये २० ऑक्टोबर रोजी सूर्यास्त सायंकाळी सुमारे ६ वाजून १२ मिनिटांनी होण्याची शक्यता आहे. मात्र, रावण दहनाची निश्चित वेळ प्रत्येक शहरात आणि ठिकाणी वेगळी असू शकते. त्यामुळे संबंधित मंडळ, आयोजक यांच्या नुसार रावण दहन वेगळ्या वेगळ्या वेळी होऊ शकते.