
मुंबई : हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राची विशेष काळजी घेतली जाते. वास्तु नियमांचे पालन केल्यास घरात सुख-समृद्धी टिकून राहते. घर बांधण्यापासून ते घरात राहण्यापर्यंत अनेक नियम आहेत, ज्याकडे दुर्लक्ष केल्याने वास्तूदोष (Vastudosh) निर्माण होतात. घरातील वास्तुदोषांमुळे घरातील सदस्यांवर नकारात्मक प्रभाव पडतो. जर तुम्हालाही वास्तू दोषांमुळे पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर वास्तुशास्त्रात यासंबंधी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. यासाठी तुम्ही गुग्गूळ वापरू शकता. गुग्गूळचे काही उपाय केले तर घरातील वास्तुदोष दूर होतो.
जर तुमच्या घरात रोज भांडणं होत असतील तर रोज घरात गुग्गूळाचा धूप लावा. एकादशी, त्रयोदशी, अमावस्या आणि पौर्णिमा तिथी या विशेष दिवशी घरामध्ये गुग्गूळ धूप जाळल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात. या उपायाने पती-पत्नीचे नातेही मजबूत होते. यासोबतच मानसिक शांती राहते.
वास्तुशास्त्रानुसार पिवळी मोहरी मिसळून गुग्गूळ धूप सलग 7 दिवस घरात जाळल्यास नकारात्मक शक्ती निघून जातात. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. शनिवारपासून हा उपाय सुरू करावा. शनिवारी संध्याकाळी आरती केल्यानंतर गुग्गल धूप जाळा. हा धूर घरभर दाखवा.
जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट कार्यात यश मिळवायचे असेल तर तुम्ही गुग्गूळ धूप वापरू शकता. यासाठी शुध्द तूप, पिवळी मोहरी, लोबान आणि गुग्गूळ हे सतत 21 दिवस संध्याकाळी गायीच्या गौऱ्यावर जाळावे. हा उपाय केल्यास प्रत्येक कामात यश मिळते. त्याचबरोबर बिघडलेली कामेही होऊ लागतात.
गुग्गूळमध्ये अनेक फायदेशीर घटक आहेत. याच्या वासामुळे हवेतील जंतू नष्ट होतात असे म्हणतात. पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि विषाणूंच्या प्रसारामुळे बहुतेक रोग होतात. गंभीर आजार टाळण्यासाठी गुग्गलची धूप रोज द्यावी. यामुळे वातावरण शुद्ध आणि सुगंधित राहील. या धुणीचा सुगंध केवळ देवांनाच प्रसन्न करत नाही तर माणसाचा मानसिक थकवाही दूर करतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)