
भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीच्या सणाला केवळ धार्मिकच नव्हे, तर खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टीनेही अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, त्यालाच मकर संक्रांत असे म्हटले जाते. येत्या १४ जानेवारी २०२६ रोजी होणारे हे मार्गक्रमण देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीवर मोठा प्रभाव टाकणारे ठरणार आहे.
पंचांगानुसार, यंदाच्या संक्रांतीचे नाव नंदा असून तिचे स्वरूप अत्यंत प्रभावी आणि वेगवान असल्याचे दिसून येत आहे. संक्रांतीच्या विविध अवयवांवरून पुढील अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यंदा संक्रांतीचे वाहन घोडा (अश्व) असून उपवाहन सिंह आहे. घोडा हा वेगाचे प्रतीक आहे, तर सिंह पराक्रमाचे प्रतीक आहे. यामुळे जागतिक राजकारणात आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अत्यंत वेगाने घडामोडी घडण्याचा अंदाज आहे.
तसेच यंदा संक्रांतीच्या हातात गदा असून तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. गदा हे शिस्तीचे प्रतीक असल्याने प्रशासकीय कामात कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तर यंदा संक्रांत बसलेल्या स्थितीत आहे, जी व्यापारी वर्गासाठी सुरुवातीच्या अस्थिरतेनंतर स्थैर्य देणारी ठरेल.
यंदाच्या संक्रांतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल ११ वर्षांनंतर मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी एकाच दिवशी येत आहेत. या दुहेरी योगामुळे या दिवशी तिळाचा वापर आणि दान करण्याचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. या दिवशी केलेले दान दुप्पट पुण्य देणारे ठरेल, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
यंदा संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे आणि कस्तुरीचे लेपन लावल्यामुळे सुगंधी द्रव्ये, सोने, हळद, पितळ आणि कडधान्यांच्या (विशेषतः हरभरा डाळ) किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच संक्रांतीचा प्रवास दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे होत आहे. त्यामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये विकासाची गती वाढून तिथे मोठ्या प्रकल्पांची घोषणा होऊ शकते.
संक्रांतीच्या या ग्रहस्थितीचा सर्व १२ राशींवर परिणाम होणार आहे. यानुसार मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि कुंभ या राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ प्रगतीकारक आणि धनलाभ देणारा ठरेल. तर वृषभ, कन्या, वृश्चिक आणि मीन या राशींना संमिश्र फळे मिळतील. मेहनतीनुसार यश प्राप्त होईल. तसेच कर्क आणि मकर राशीच्या लोकांनी या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. लांबचा प्रवास टाळण्याचा प्रयत्न करावा.