नवरात्रीत यंदा घडणार खास योग! अष्टमी-नवमी एकाच दिवशी; जाणून घ्या तारखा आणि धार्मिक महत्त्व

Navratri 2026: यंदाच्या नवरात्रीत एकाच दिवशी दोन महत्त्वाच्या तिथी येणार आहेत! नवरात्रीच्या तारखांमध्ये यंदा नेमकं काय बदललं? जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि धार्मिक महत्त्व.

नवरात्रीत यंदा घडणार खास योग! अष्टमी-नवमी एकाच दिवशी; जाणून घ्या तारखा आणि धार्मिक महत्त्व
| Edited By: | Updated on: Oct 02, 2026 | 3:08 PM

नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी यंदाचं वर्ष काहीसं खास असणार आहे. देवीच्या नऊ रूपांची आराधना, घटस्थापना, उपवास आणि विविध धार्मिक विधींनी साजऱ्या होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला यंदा ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र, तिथींच्या गणनेमुळे यावर्षी नवरात्रीत अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी येणार आहेत. त्यामुळे अष्टमी-नवमीच्या पूजा-विधींबाबत भाविकांमध्ये उत्सुकता आहे. नेमक्या कोणत्या दिवशी कोणती तिथी असेल आणि यंदाच्या नवरात्रोत्सवातील महत्त्वाचे दिवस कोणते, जाणून घेऊया.

या दिवशीपासून नवरात्रोत्सव

Loading...

हिंदू पंचांगानुसार यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी घटस्थापनेने सुरुवात होणार आहे. प्रतिपदा तिथीला देवीची पूजा करून नवरात्रीच्या उत्सवाला प्रारंभ केला जाईल. त्यानंतर नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची भक्तिभावाने आराधना केली जाईल. या काळात अनेक भाविक उपवास आणि विशेष पूजा करतात. २० ऑक्टोबर २०२६ रोजी विजयादशमी अर्थात दसरा साजरा करून नवरात्रोत्सवाची सांगता होईल.

अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी का?

यंदाच्या नवरात्रोत्सवातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अष्टमी आणि नवमी तिथी एकाच दिवशी येणार आहेत. पंचांगानुसार, अष्टमी तिथी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ८.२७ वाजता सुरू होऊन १९ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे १०.५१ वाजेपर्यंत राहणार आहे. त्यानंतर नवमी तिथी सुरू होईल.
यामुळे १९ ऑक्टोबर रोजी सूर्योदयाच्या वेळी अष्टमी तिथी असेल. त्यामुळे अष्टमीशी संबंधित पूजा-विधी या दिवशी केले जातील. त्यानंतर नवमी तिथी सुरू झाल्याने महानवमीशी संबंधित विधीही याच दिवशी येणार आहेत.

१९ ऑक्टोबर ठरणार महत्त्वाचा दिवस

१९ ऑक्टोबर हा दिवस यंदाच्या नवरात्रीतील विशेष दिवस ठरणार आहे. या दिवशी दुर्गा अष्टमीशी संबंधित पूजा, महागौरीची आराधना आणि कन्या पूजन केले जाऊ शकते. अष्टमी तिथी संपल्यानंतर नवमी सुरू होणार असल्याने महानवमीशी संबंधित पूजा-विधीही याच दिवशी केले जातील. अष्टमी आणि नवमीच्या तिथी एकाच दिवशी आल्याने भाविकांना दोन्ही तिथींशी संबंधित धार्मिक विधींच्या वेळांकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची आराधना

नवरात्रोत्सवात देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. प्रत्येक दिवसाला देवीच्या एका रूपाचे विशेष महत्त्व मानले जाते. भाविक आपल्या श्रद्धेनुसार उपवास, पूजा, आरती आणि इतर धार्मिक विधी करतात. शैलपुत्रीपासून सिद्धिदात्रीपर्यंत देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या काळात अनेक मंदिरांमध्ये विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. घराघरांतही देवीची स्थापना करून भक्तिभावाने पूजा केली जाते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us