नवरात्रीत सोने, वाहन अन् मालमत्ता खरेदीसाठी कोणता दिवस शुभ? जाणून घ्या योग्य तारीख
Navratri 2026: नवरात्रीत नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. विशेषतः सोने, गाडी किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी अनेक जण योग्य दिवस आणि मुहूर्त पाहतात. नवरात्रीतील कोणता दिवस खरेदीसाठी उत्तम आहे, हे येथे जाणून घ्या.

हिंदू धर्मात नवरात्री अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या नऊ दिवसांत दुर्गा देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. या काळात उपासना, धार्मिक विधींप्रमाणेच नवीन वस्तू खरेदी करणे, घर किंवा वाहन घेणे तसेच नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. अनेक जण नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याला प्राधान्य देतात. मात्र, खरेदी करताना योग्य दिवस आणि शुभ मुहूर्त कोणता, असा प्रश्न अनेकांना पडतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, नवरात्रीतील तिथी, वार, नक्षत्र आणि विविध शुभ योगांचा विचार करून खरेदीचा मुहूर्त ठरवला जातो. यंदा शुक्र ग्रहाच्या वक्री स्थितीमुळे सोने, वाहन आणि मालमत्ता खरेदी करताना काळजी घेण्याचा देखील सल्ला दिला जात आहे. अशा वेळी नवरात्रीतील कोणते दिवस खरेदीसाठी शुभ आहेत हे जाणून घेऊया.
नवरात्रीतील सर्वार्थ सिद्धी योगाचे शुभ दिवस
विशिष्ट नक्षत्र आणि वार यांच्या संयोगातून सर्वार्थ सिद्धी योग तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, हा योग सर्व कार्यांमध्ये यश मिळवून देणारा मानला जातो. या योगात नवीन खरेदी, गुंतवणूक, बुकिंग किंवा नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. यंदा नवरात्रीत शुभ कार्यांसाठी तीन दिवस विशेष महत्त्वाचे आहेत.
१४ ऑक्टोबर (बुधवार) – या दिवशी सकाळी ६.२१ पासून १५ ऑक्टोबरच्या पहाटे ४.०३ वाजेपर्यंत अनुराधा नक्षत्र आहे. हा काळ खरेदीसाठी शुभ मानला जातो. या दिवशी सोने, जमीन किंवा वाहन खरेदी करू शकता.
१८ ऑक्टोबर (रविवार) – या दिवशी दुपारी १२.४९ पासून १९ ऑक्टोबरच्या सकाळी ६.२४ वाजेपर्यंत उत्तराषाढा नक्षत्रात सर्वार्थ सिद्धी योग आहे. रविवार हा सूर्याचा वार असून, उत्तराषाढा नक्षत्राचा संबंधही सूर्याशी जोडला जातो. याशिवाय, या दिवशी दुपारच्या वेळी अष्टमी तिथी असल्याने सोने खरेदीसाठी हा एक विशेष शुभ संयोग मानला जातो.
१९ ऑक्टोबर (सोमवार) – या दिवशी दुपारी ३.३८ पासून २० ऑक्टोबरच्या सकाळी ६.२५ वाजेपर्यंत श्रवण नक्षत्रात सर्वार्थ सिद्धी योग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, श्रवण नक्षत्र प्रवास आणि वाहन खरेदीसाठी शुभ मानले जाते. याशिवाय, या दिवशी नवमी तिथी असल्याने नवीन वाहन खरेदीसाठी हा काळ अनुकूल मानला जातो.
याशिवाय, २० ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, दसरा हा अबूझ मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी शुभ कार्य करण्यासाठी स्वतंत्र मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे सोने खरेदी, नवीन वाहन घरी आणणे, मालमत्ता बुक करणे किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दसऱ्याचा दिवस शुभ मानला जातो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)