पितृपक्षात चुकूनही खरेदी करू नका या ६ वस्तू; जाणून घ्या यामागची धार्मिक मान्यता
पितृपक्षात पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तर्पण, पिंडदान, पंचबली, ब्राम्हण भोजन आणि दान केले जाते. पण या काळात काही वस्तू खरेदी करू नये अशी धार्मिक मान्यता आहे. या कोणत्या वस्तू आहेत हे येथे जाणून घ्या.

२६ सप्टेंबर पासून पितृपक्ष सुरू होत आहे. पितृपक्ष हा १६ दिवसांचा कालावधी आहे, ज्यामध्ये पूर्वजांचे स्मरण केले जाते. या काळात पिंडदान, तर्पण आणि ब्राम्हण ब्राह्मण भोजन आणि दान केल्या जातात. असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात, अशी मान्यता आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, पितृपक्षात विवाह, गृहप्रवेश आणि मुंज यांसारखे शुभ कार्यक्रम निषिद्ध मानले जातात. असे म्हटले जाते की या काळात शुभ कार्ये केल्याने पितृदोष लागतो आणि पूर्वज क्रोधित होऊ शकतात. पितृपक्षात नवीन कपड्यांसह काही वस्तू खरेदी करण्यास देखील मनाई आहे. हिंदू धार्मिक परंपरेनुसार, पितृपक्ष हा आदर, प्रार्थना आणि पूर्वजांचे स्मरण करण्याचा काळ आहे. हा संयम आणि साधेपणाचा काळ मानला जातो. त्यामुळे या काळात नवीन किंवा भौतिक सुखसोयींच्या वस्तू खरेदी करणे टाळावे. चला तर जाणून घ्या पितृपक्षात कोणत्या मुख्य वस्तू खरेदी करू नयेत.
नवीन कपडे आणि दागिने
पितृपक्षात वैयक्तिक वापरासाठी नवीन कपडे, सोन्या-चांदीचे दागिने किंवा फॅशनच्या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते. या काळात स्वतःऐवजी पूर्वजांवर लक्ष केंद्रित करणे शुभ मानले जाते. जर एखादी वस्तू दानधर्मासाठी, पूर्वजांची प्रार्थना करण्यासाठी किंवा गरिबांना मदत करण्यासाठी खरेदी केली जात असेल, तर त्याला मनाई नाही.
वाहने आणि मालमत्ता
या काळात नवीन कार, बाईक, नवीन घर किंवा जमीन खरेदी करणे निषिद्ध मानले जाते. कोणत्याही नवीन आणि शुभ कार्याची सुरुवात म्हणून हे केले जाते, जे पितृपक्षात केले जात नाही.
झाडू
झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. पौराणिक समजुतींनुसार, पितृपक्षात नवीन झाडू विकत घेतल्यास आर्थिक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे या काळात झाडू खरेदी करू नये.
मोहरीचे तेल
पितृपक्षात मोहरीचे तेल खरेदी करून घरी आणणे शुभ मानले जात नाही, अशी मान्यता आहे. मोहरीचे तेल शनि देवांशी संबंधित असल्याचे धार्मिक परंपरेत मानले जाते. म्हणून या काळात मोहरीचे तेल खरेदी करणे टाळावे.
मीठ
श्राद्धाच्या दिवसांत नवीन मीठ खरेदी करणे टाळावे, अशी धार्मिक मान्यता आहे. या काळात मीठ कोणाला उधार देणे किंवा दुसऱ्याकडून घेणेही टाळले पाहिजे. असे केल्याने पितर नाराज होऊ शकतात, अशी श्रद्धा आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि नवीन फर्निचर
पितृपक्षात वैयक्तिक वापरासाठी नवीन टीव्ही, रेफ्रिजरेटर, सोफा, पलंग किंवा घराच्या सजावटीच्या वस्तू खरेदी करणे योग्य मानले जात नाही. पितृपक्ष हा उत्सव साजरा करण्याचा किंवा सणासुदीच्या खरेदीचा काळ नसून, तो शोक, कृतज्ञता आणि साधेपणाचा काळ मानला जातो. त्यामुळे या काळात इलेक्रॉनिक्सच्या वस्तू, नवीन फर्निचर घेणे टाळावे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)