इंग्लंडकडून दारुण पराभवानंतर पाकिस्तानला दुहेरी फटका! आयसीसीकडून दंड आणि रँकिंगमध्येही बसला धक्का

पाकिस्तानचा संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये गेला होता. पण तिन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली. इतकंच काय तर दुहेरी फटकाही बसला आहे.

इंग्लंडकडून दारुण पराभवानंतर पाकिस्तानला दुहेरी फटका! आयसीसीकडून दंड आणि रँकिंगमध्येही बसला धक्का
दारुण पराभवानंतर पाकिस्तानला दुहेरी फटका! आयसीसीकडून दंड आणि रँकिंगमध्येही बसला धक्का
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 14, 2026 | 3:52 PM

बर्मिंगहॅम येथे झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या 133 धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडने 453 धावा करत 320 धावांची प्रचंड आघाडी घेतली. दुसऱ्या डावात शान मसूदच्या 95 आणि नवोदित गोलंदाज रझाउल्लाहच्या वादळी 81 धावांच्या जोरावर पाकिस्तानने 449 धावा उभारून इंग्लंडसमोर 130 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना जो रूट 23 धावांवर क्लीन बोल्ड झाला होता, परंतु तो चेंडू ‘नो-बॉल’ ठरल्याने त्याला मोठे जीवनदान मिळाले; ज्याचा फायदा घेत त्याने नाबाद 62 धावा करत इंग्लंडला 8 गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवून दिला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 0-3 ने व्हाईटवॉश स्वीकारावा लागल्यानंतर, आता पाकिस्तानी क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मोठा दणका दिला आहे. बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यादरम्यान षटकांचा संथ वेग ठेवल्याबद्दल आयसीसीने पाकिस्तानवर ही कडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे आधीच दारुण पराभवाचा सामना करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

सामना शुल्कातून 50% कपात

तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने निर्धारित वेळेत लक्ष्यापेक्षा तब्बल 11 षटके कमी गोलंदाजी केली. आयसीसीच्या आचारसंहितेनुसार, खेळाडूंना प्रत्येक कमी टाकलेल्या षटकासाठी त्यांच्या सामना शुल्काच्या 5% दंड ठोठावला जातो. पाकिस्तानने 11 षटके कमी टाकल्यामुळे आयसीसीने कडक पाऊल उचलत संपूर्ण संघाच्या सामना शुल्कातून 50 टक्के कपात केली आहे. या आर्थिक दंडामुळे पाकिस्तानी खेळाडूंना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला प्रति तास सरासरी 15 षटके टाकणे बंधनकारक असते.

WTC गुण कापले; रँकिंगमध्ये सर्वात खाली घसरण

या आर्थिक दंडाव्यतिरिक्त पाकिस्तानला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणांचाही मोठा फटका बसला आहे. संथ ओव्हर-रेटच्या नियमांनुसार पाकिस्तानचे 11 महत्त्वाचे गुण कापण्यात आले आहेत. या मोठ्या कपातीमुळे पाकिस्तानचा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सर्वात तळाशी घसरला असून, सध्या 4.63 टक्के गुणांसह नवव्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात मायदेशात नोव्हेंबर 2026 मध्ये 2 कसोटी सामने खेळवले जातील त्यांनंतर पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मायदेशातमार्च 2027 मध्ये 2 कसोटी सामने होतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us