ज्याच्या फिरकीने फलंदाजांची शिकार केली, तोच आता दिल्लीला शिकवणार फिरकीचे डावपेच; ‘हॅट्ट्रिक मॅन’वर सोपवली नवी जबाबदारी
IPL 2027 Amit Mishra News: अमित मिश्रा याची दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रँचायझीने ही अधिकृत घोषणा केली आहे.

आयपीएल २०२७ च्या आधी दिल्ली कॅपिटल्सने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. संघाने भारताचा माजी लेग-स्पिनर अमित मिश्रा याची फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आयपीएलमध्ये आपल्या फिरकी आणि गुगलीने फलंदाजांना त्रस्त करणारा मिश्रा आता प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने अमित मिश्रा याच्या प्रशिक्षकपदी नियुक्तीचा आनंद साजरा करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
यामध्ये अमित मिश्राने दिल्लीसोबतच्या आपल्या दीर्घ सहवासाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी सांगितले की, दिल्लीसोबतचा त्यांचा पहिला हंगाम एक खेळाडू म्हणून होता. आता प्रशिक्षक म्हणून त्यांचा पहिला हंगामही त्याच संघासोबत असेल. व्हिडिओमध्ये मिश्राने सांगितलं की, वाघ आपल्या शिकारीला कधीही सोडत नाही आणि दिल्ली हे त्याचे हृदय आहे.” अमित मिश्रा २००८ ते २०२४ दरम्यान आयपीएलमध्ये खेळला. त्याने २००३ मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात पदार्पण केले होते.
यावेळी दिल्ली कॅपिटल्सने सौरव गांगुलीची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली असून युवराज सिंग सहायक प्रशिक्षक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. संघाने चमिंडा वासची वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही घोषणा केली आहे. मिश्राने आयपीएलमध्ये १६२ सामने खेळून १७४ बळी घेतले. त्यांनी २००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळताना डेक्कन चार्जर्सविरुद्ध, २०११ मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध आणि २०१३ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्ध हॅट-ट्रिक घेतली.
अमित मिश्राने ४ सप्टेंबर २०२५ रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. तो त्याच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजी आणि उत्कृष्ट नियंत्रणासाठी ओळखला जातो. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर तीन हॅट-ट्रिक्स आहेत. ज्यामुळे तो या स्पर्धेत तीन हॅट-ट्रिक्स घेणारा एकमेव गोलंदाज ठरला आहे. ४३ वर्षीय अमित मिश्राने भारतासाठी २२ कसोटी, ३६ एकदिवसीय आणि १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर एकूण १५६ आंतरराष्ट्रीय बळी आहेत.
त्याने भारतासाठी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१७ मध्ये खेळला होता. परंतु तो देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सक्रिय राहिला. त्याचा शेवटचा सामना आयपीएल २०२४ मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध होता. त्या सामन्यात त्याने २० धावांत एक बळी घेतला. अमित मिश्राची दिल्ली कॅपिटल्ससाठीची नवी खेळी विशेष आहे. कारण तो आता त्याच संघासोबत आहे, ज्याच्यासोबत त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील एक हंगाम खेळला होता. आता संघाच्या फिरकी गोलंदाजांमध्ये सुधारणा करणे आणि आपला दांडगा अनुभव त्यांच्यासोबत वाटून घेणे, हे त्याच्यापुढील आव्हान असेल.