
ओपनर प्रतिका रावल आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर या जोडीने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियासमोर दुसऱ्या आणि करो या मरो सामन्यात 252 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 251 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला मालिकेत आव्हान कायम ठेवायचं असेल तर दुसरा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. अशात आता गोलंदाज ऑस्ट्रेलियाला विजयी आव्हानाआधी रोखून भारतीय संघाला मालिकेत 1-1 ने बरोबरी करुन देण्यात प्रमुख भूमिका बजावणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हा होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हलमध्ये खेळवण्यात येत आहे. मालिकेच्या आणि भारताच्या दृष्टीने निर्णायक सामन्यात हरमनप्रीत कौर हीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. हरमनप्रीतने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. भारतासाठी हरमनप्रीतने आणि प्रतिका रावलने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. स्मृतीला चांगली सुरुवात मिळाली. मात्र स्मृती ही खेळी मोठ्या आकड्यात बदलण्यात अपयशी ठरली. तर लोअर मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनीही छोटेखानी मात्र निर्णायक योगदान दिलं. त्यामुळे भारताला 250 पार मजल मारता आली.
प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने भारताला अप्रतिम सुरुवात मिळवून दिली. दोघांनी 99 बॉलमध्ये 78 रन्सची पार्टनरशीप केली. स्मृतीच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. स्मृतीने 37 बॉलमध्ये 31 रन्स केल्या. जेमिमाह रॉड्रिग्स हीने निराशा केली. जेमीने 11 धावा केल्या. त्यानंतर प्रतिका रावल अर्धशतक झळकावून आऊट झाली. प्रतिकाने 81 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 52 धावा केल्या.
दीप्ती शर्मा 1 धाव करुन माघारी परतली. अमनजोत कौर हीने 13 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. लोअर ऑर्डरमध्ये ऋचा घोषकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र ऋचा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. ऋचाने 22 धावा केल्या.
काश्वी गौतम आणि हरमनप्रीत या दोघींनी सातव्या विकेटसाठी 55 रन्सची पार्टनरशीप केली. काश्वीने 25 धावा केल्या. हरमनप्रीत कौर हीने 1 सिक्स आणि 2 फोरसह 54 रन्स केल्या. क्रांती गौडने 19 धावांचं योगदान दिलं. डेब्युटंट वैष्णवी शर्मा हीने नाबाद 10 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी अलाना किंग, अनाबेल सदरलँड आणि एश्ले गार्डनर या तिघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर निकोला कॅरी आणि मेगन शूट या दोघींनी 1-1 विकेट मिळवली.