ENG vs NZ 2nd Test : इंग्लंडकडून सलग दुसऱ्या विजयासाठी टीम जाहीर, 15 खेळाडूंची निवड, कुणाला संधी?

England vs New Zealand 2nd Test : इंग्लंड क्रिकेट टीमने पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला. मात्र विजयानंतरही इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी काही बदल केले आहेत. जाणून घ्या.

ENG vs NZ 2nd Test : इंग्लंडकडून सलग दुसऱ्या विजयासाठी टीम जाहीर, 15 खेळाडूंची निवड, कुणाला संधी?
England Cricket Team
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 10, 2026 | 9:26 PM

इंग्लंड क्रिकेट टीम सध्या मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. इंग्लंडने बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पराभूत करत विजयी सलामी दिली. इंग्लंडने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये झालेल्या सामन्यात 115 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे आता इंग्लंडकडे आता सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे न्यूझीलंडसाठी दुसरा सामना हा करो या मरो असा आहे. उभयसंघातील दुसरा सामना हा बुधवार 17 जूनपासून खेळवण्यात येणार आहे. हा सामना केनिंग्टन ओव्हल, लंडन इथे होणार आहे. इंग्लंडने या सामन्याच्या 1 आठवड्याआधीच टीम जाहीर केली आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने परंपरेनुसार सामन्याच्या अनेक दिवसाआधीच संघ जाहीर केला आहे. निवड समितीने दुसऱ्या सामन्यासाठी 15 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. इंग्लंडने या सामन्यासाठी विजयानंतरही काही बदल केले आहेत. त्या बदलांबाबत जाणून घेऊयात.

कुणाला संधी आणि कुणाला डच्चू?

निवड समितीने दुसऱ्या कसोटी सामन्यात नियमित कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस एटकीन्सन या दोघांना बाहेर केलं आहे. दोघांना बाहेर केल्याने इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीची ताकद काही प्रमाणात कमी झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र या दोघांच्या जागी अनुभवी गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. टीममध्ये वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचं कमबॅक झालं आहे. जोफ्रा आर्चर याच्यासह जॉर्डन कॉक्स याचा समावेश करण्यात आला आहे. जॉर्डनला बॅकअप म्हणून संधी देण्यात आली आहे.

जो रुट याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी

दरम्यान बेन स्टोक्स याला बाहेर करण्यात आल्याने इंग्लंड दुसऱ्या कसोटीत नव्या कर्णधारासह खेळणार असल्याचं निश्चित आहे. अनुभवी फलंदाज जो रुट हा दुसऱ्या कसोटी सामन्यात हंगामी कर्णधार म्हणून इंग्लंडच्या नेतृत्वाची जबाबादारी सांभाळणार आहे.

न्यूझीलंड विरूद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, सोनी बेकर, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, मॅथ्यू फिशर, एमिलियो गे, जेम्स रीव, ओली रॉबिन्सन, जेमी स्मिथ आणि जोश टंग.

Follow Us