क्रिकेटमध्ये नात्याचं अनोखं उदाहरण! 70 वर्षांची आजी खेळाडू, नात कॅप्टन; ऐतिहासिक T20I डेब्यू करत रचला इतिहास

Evonne Wildosola Record News: चिलीच्या इव्होन विल्डोसोला यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा क्रिकेट बॅट हातात घेतली. या वर्षी एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

क्रिकेटमध्ये नात्याचं अनोखं उदाहरण! 70 वर्षांची आजी खेळाडू, नात कॅप्टन; ऐतिहासिक T20I डेब्यू करत रचला इतिहास
| Updated on: Sep 28, 2026 | 9:39 PM

चिलीच्या इव्होन विल्डोसोला यांनी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. वयाच्या ७० व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण करून त्यांनी ही ऐतिहासिक नोंद लिहिली आहे. २०१९ साली पहिल्यांदा बॅट हातात घेणाऱ्या इव्होन विल्डोसोला यांनी या वर्षी एप्रिलमध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. ७० वर्षीय इव्होन विल्डोसोला यांना कॅमिला ओयार्सच्या नेतृत्वाखाली चिलीच्या महिला क्रिकेट संघाकडून आपला पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे इव्होन विल्डोसोला आणि कॅमिला ओयार्स या आजी आणि नात आहेत.

या ७० वर्षीय आजीने आपल्या नातीच्या नेतृत्वाखाली टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. चिलीच्या महिला क्रिकेट संघापर्यंतच्या आपल्या प्रवासाबद्दल सांगताना इव्हॉन विल्डोसोला म्हणाल्या की, माझ्या नातीसोबत खेळायला येणाऱ्या मित्रांसाठी स्वयंपाक करणे, हेच माझे काम होते. माझी नात क्रिकेट खेळत असल्यामुळे मी त्याबद्दल ऐकले होते. पण हळूहळू या खेळात माझी आवड वाढत गेली. माझी मुलगी लोरेटो आणि नात कॅमिला यांनी मला प्रोत्साहन दिले. परिणामी कुटुंबापासून सुरू झालेला हा प्रवास आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.

Loading...

एप्रिल २०२६ मध्ये कोस्टा रिकाविरुद्धच्या एका टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ७० वर्षीय इव्हॉन विल्डोसोला यांनी केवळ आपली नात कॅमिलाच्या नेतृत्वाखाली पदार्पणच केले नाही, तर तिच्यासोबत डावाची सुरुवातही केली. हा एक जागतिक विक्रम ठरला. वयाच्या ७० व्या वर्षी त्या जगातील सर्वात वयस्कर सक्रिय क्रिकेटपटू बनल्या. इतकेच नाही, तर त्या व्यावसायिक क्रिकेट खेळणाऱ्या दुसऱ्या सर्वात वयस्कर क्रिकेटपटू ठरल्या.

त्यांच्या आधी राजा महाराज सिंग यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी १९५०-५१ मध्ये प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता प्रश्न असा आहे की, त्या ७० वर्षीय क्रिकेटपटूने तिच्या पहिल्या सामन्यात कशी कामगिरी केली? इव्हॉन विल्डोसोला यांनी त्यांची नात कॅमिलासोबत चिलीसाठी डावाची सुरुवात केली. मात्र त्यांचा डाव अवघ्या चार चेंडूंनंतरच संपला. त्यांनी चार चेंडूंमध्ये एकही धाव काढली नाही आणि खाते न उघडताच त्या बाद झाल्या.

तर दुसरीकडे, त्यांच्या नातीने २३ चेंडूंचा सामना करत केवळ एक धाव काढली. ७० वर्षीय इव्होन विल्डोसोला यांच्या कोस्टा रिकाविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात चिलीने २० षटकांत ८ गडी गमावून ८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोस्टा रिकाने ८२ धावांचे लक्ष्य ६.५ षटकांत केवळ २ गडी गमावून पूर्ण केले. अशाप्रकारे चिलीच्या महिला क्रिकेट संघाला ८ गडी राखून पराभव पत्करावा लागला. ७० वर्षीय इव्हॉन विल्डोसोला यांनी आतापर्यंत दोन टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून दोन्ही सामने कोस्टा रिकाविरुद्ध होते. मात्र त्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना एकही धाव करता आली नाही. एकूण इव्हॉन विल्डोसोला यांनी केवळ पाच चेंडूंचा सामना केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us