
क्रिकेट चाहत्यांना 11 फेब्रुवारीला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 13 व्या सामन्यात डबल सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. या सामन्यात डी ग्रुपमधील दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने होते. उभयसंघातील सामन्याचं आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. अफगाणिस्तानला 188 च्या प्रत्युत्तरात 187 पर्यंतच पोहचता आलं. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. पहिली सुपर ओव्हरही टाय झाली. त्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजेता निश्चित झाला.
अफगाणिस्तानला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये 24 धावांच्या प्रत्युत्तरात 19 धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे 4 धावांनी सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या बॉलवर मात करत विजय मिळवला. अफगाणिस्तानचा हा सलग दुसरा पराभव ठरला. तर दक्षिण आफ्रिकेचा हा साखळी फेरीतील सलग दुसरा विजय ठरला. दक्षिण आफ्रिका डी ग्रुपमधून सलग दुसरा सामना जिंकणारी न्यूझीलंड नंतरची दुसरी टीम ठरली. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह सुपर 8 साठी दावा मजबूत केलाय. तर अफगाणिस्तानचं दुसऱ्या पराभवामुळे सुपर 8 फेरी गाठणं फार अवघड होऊन बसलंय.
अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयासाठी 100 टक्के प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. अफगाणिस्तानच्या या पराभवामुळे त्यांच्या सुपर 8 मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. प्रत्येक संघाला साखळी फेरीत 4 सामने खेळायचे आहेत. सुपर 8 मध्ये पोहचण्यासाठी किमान 2 सामने जिंकायचे आहेत. तसेच प्रत्येक गटातून 5 पैकी अव्वल 2 संघ सुपर 8 मध्ये पोहचणार आहेत.
ताज्या आकडेवारीनुसार, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे 2 संघ पॉइंट्स टेबलमध्ये डी ग्रुपमधून पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत. दोन्ही संघ अजिंक्य आहेत. त्यामुळे हे दोन्ही संघ सुपर 8 मध्ये पोहचणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.
अफगाणिस्तानला सलग 2 पराभवांसह आता स्वत:च्या जोरावर सुपर 8 मध्ये पोहचता येणार नाही, हे निश्चित झालंय. अफगाणिस्तानला आता चांगल्या कामगिरीसह नशिबाची साथ लागेल. मात्र अफगाणिस्तानचं सुपर 8 चं समीकरण पाहता ते अशक्यच आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
अफगाणिस्तानचे उर्वरित 2 सामने हे यूएई आणि कॅनडा विरुद्ध होणार आहेत. अफगाणिस्तानला हे दोन्ही सामने नेट रनरेट सुधारण्यासाठी मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. अफगाणिस्तानच्या हातात इतकंच आहे. त्यानंतर अफगाणिस्तान सुपर 8 मध्ये पोहचणार की नाही? हे डी ग्रुपमधील इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून असेल.
न्यूझीलंड आणि यूएईने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करायला हवं. त्यानंतर कॅनडाने यूएईला आणि न्यूझीलंडने कॅनडाला पराभूत केलं पाहिजे. असं झालं तर न्यूझीलंड अव्वल स्थानी राहिल. तर दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानचे समसमान 4 गुण होतील. अफगाणिस्तान अशा परिस्थितीत नेट रनरेटच्या जोरावर सुपर 8 साठी पात्र ठरेल.
दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड आणि यूएईला पराभूत करावं. कॅनडाने न्यूझीलंडवर मात करावी. तसेच यूएईने कॅनडावर विजय मिळवावा. वरील समीकरण जुळल्यास दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात 8 गुण होतील. तर न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानच्या खात्यात प्रत्येकी 4-4 गुण होतील. त्यानंतर न्यूझीलंडच्या तुलनेत नेट रनरेट चांगला असल्यास अफगाणिस्तान सुपर 8 साठी क्वालिफाय करेल.