
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 45 व्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. इंग्लंड आणि पाकिस्तान दोन्ही संघांचा हा सुपर 8 फेरीतील दुसरा सामना आहे. इंग्लंडने श्रीलंकेवर मात करत सुपर 8 मध्ये विजयाचं खातं उघडलं. तर पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातील सुपर 8 फेरीतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आला. त्यामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी कोणत्याही स्थितीत इंग्लंड विरुद्ध विजय मिळवावाच लागणार आहे.
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर 8 फेरीतील या सामन्याचं आयोजन हे श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार सलमान आघा याने बॅटिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पाकिस्तानचे फलंदाज कडक बॅटिंग करत मोठी धावसंख्या करणार की इंग्लंड त्यांना 20 ओव्हरआधीच गुंडाळणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंग्लंड श्रीलंकेविरुद्धच्याच प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरली आहे. इंग्लंडने सुपर 8 मधील आपल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर मात करत विजयी सुरुवात केली होती. त्यामुळे आता इंग्लंडकडे पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्याची संधी आहे. त्यामुळे पाकिस्तान इंग्लंडला सलग दुसऱ्या विजयापासून रोखत आपलं आव्हान कायम राखण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाकिस्तानने या निर्णायक सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. वेगवान गोलंदाज शाहिन शाह अफ्रिदी याचं कमबॅक झालं आहे. तर फहीम अश्रफ याला बाहेर करण्यात आलं आहे.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान आगा (कॅप्टन), बाबर आझम, फखर जमान, उस्मान खान (विकेटकीपर), शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, सलमान मिर्झा आणि उस्मान तारिक.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), जेकब बेथेल, टॉम बँटन, हॅरी ब्रूक (कर्णधार), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद.